
स्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप
वाशीम (दिपक भारुका) वाशीम जिल्ह्यातील शहर आणि तालुक्यातील भागात स्वस्त धान्य दुकानांमधून नागरिकांना निकृष्ट दर्जाच्या धान्याचा पुरवठा केला जात आहे. किडलेला, सडलेला,अत्यंत नीकृष्ठ दर्जाचे धान्य असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
गरीब कुटुंबीयांना स्वस्त धान्य दुकानामधून दोन रुपये दराने गहू तर तीन रुपये दराने तांदूळ प्रति किलो देण्यात येते. त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने रेशनिगंचे धान्य घेण्याशिवाय पर्याय नाही. त्यांनी दुकानदारांकडे तक्रार केल्यास सरकारकडून निकृष्ट दर्जाचे धान्य पुरविले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
मागील काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूचे दर गगनाला भिडू लागले आहेत. धान्याचे दरही आवाक्याबाहेर गेल्यामुळे घरखर्च भागविताना सामान्य नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मागील महिन्यात वितरित करण्यात आलेल्याधान्य अत्यंत नीकृष्ट दर्जाचे आढळून आले. कोरोना परिस्थितीमध्ये कित्येक कुटुंबे रेशनच्या धान्यावर उदरनिर्वाह करीत आहेत. त्यातही धान्य नीकृष्ट दर्जाचे असल्याने गरीब कुटुंबातील लोक हवालदिल झाले आहेत.
लवकरात लवकर लोकांना चांगल्या दर्जाचे धान्य वितरित करण्यात यावे व निकृष्ट धान्याचे वाटप करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शुभम आढाव भाजपा युवा मोर्चा वाशिम शहर उपाध्यक्ष यांनी केली आहे