पश्चिम विदर्भ

बोगस बियाणेविषयी शेतकऱ्यांच्या तक्रारी नोंदवून घ्याव्यात – पालकमंत्री शंभूराज देसाई

जिल्ह्यातील खरीप हंगाम पीक परिस्थितीचा आढावा

• अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत

वाशिम, दि. १९ (दिपक भारूका): खासगी कंपन्यांचे बियाणे उगविले नसल्याची तक्रार घेवून शेतकरी पोलीस ठाण्यात आल्यास त्यांची तक्रार नोंदवून घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलीस प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज, १९ जुलै रोजी खरीप पीक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, खासदार भावना गवळी, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार किरणराव सरनाईक, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा कृषि विकास अधिकारी विकास बंडगर, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मैंत्रवार, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, महावितरणचे कार्यकारी अभियंता तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री देसाई म्हणाले, खरीप हंगामाची १०० टक्के पेरणी झाली असून पावसामुळे पिकांची परिस्थिती सध्या चांगली आहे. यंदा खरीप हंगामामध्ये कृषि विभागाने केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांनी घरच्या बियाण्यावर बीजप्रक्रिया करून पेरणी केली. त्यामुळे यंदा बियाणे उगविले नसल्याच्या तक्रारी कमी झाल्या आहेत. तरीही शेतकऱ्यांनी खासगी कंपनीकडून घेतलेले बियाणे उगविले नसल्यास संबंधित शेतकरी खासगी कंपनीविरुद्ध तक्रार दाखल करण्यास पोलीस ठाण्यात आल्यास त्याची तक्रार नोंदवून घ्यावी. तसेच कृषि विभागामार्फत संबंधित तक्रारीची शहनिशा करून संबंधित कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करावी, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावर्षी शेतकऱ्यांनी घरगुती बियाणे वापरावर भर दिल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

शेतकऱ्यांना रासायनिक खतांची कमतरता भासू नये, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत ८३ हजार ४६९ शेतकऱ्यांना ६८६ कोटी १५ लाख रुपये पीक कर्ज वितरण झाले आहे. सुमारे ८० टक्के पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्याची कार्यवाही त्वरित करावी, अशा सूचना पालकमंत्री देसाई यांनी दिल्या. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण चांगले आहे. काही गावांमध्ये अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. सदर पीक नुकसानीचे पंचनामे त्वरित पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करावा, असे पालकमंत्री यावेळी म्हणाले.

खासदार गवळी म्हणाल्या, खरीप हंगामात काही कंपन्यांचे बियाणे उगविले नसल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. तसेच शेतकऱ्यांना बँकांकडून वेळेवर पीक कर्ज उपलब्ध होणे आवश्यक असून आगामी खरीप हंगामात मे अखेरपर्यंत जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध होईल, यादृष्टीने नियोजन करावे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेची चांगली अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा.

आमदार पाटणी म्हणाले, महाबीज व खासगी कंपन्यांच्या बियाण्याच्या दरात मोठी तफावत आहे, त्यामुळे जिल्ह्यात महाबीजचे बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध होणे आवश्यक आहे. याकरिता कृषि विभागाने सूक्ष्म नियोजन करून आवश्यक कार्यवाही करावी. तसेच पीक कर्ज वितरणात राष्ट्रीयकृत बँकांकडून दिरंगाई होत असल्याचे त्यांनी सांगितले. पीक विमा भरपाई मिळण्यासाठी सुद्धा विशेष प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, जिल्ह्यात गतवर्षी १५ जुलैपर्यंत ७२ हजार २० शेतकऱ्यांना सुमारे ५१६ कोटी ७७ लाख रुपये पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. यंदा १५ जुलैपर्यंत ८३ हजार ४६९ शेतकऱ्यांना ६८६ कोटी १५ लक्ष रुपयांचे पीक कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. पीक कर्जाविषयी येणाऱ्या तक्रारींची तातडीने दखल घेवून कर्ज वितरण वाढविण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी  तोटावार म्हणाले, यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १ लाख ७१ हजार क्विंटल घरगुती बियाणे वापरले. त्यामुळे शेतकऱ्यांची अंदाजे १७ कोटी रुपयांची बचत झाली आहे. बियाणे न उगविल्याच्या १९ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्यांची शहनिशा करण्यात आली आहे. जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. तसेच जिल्ह्यातील ४ महसूल मंडळातील १५ गावांमध्ये अतिवृष्टी झाली असून पीक नुकसानीचे ७५ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहे. उर्वरित पंचनामे पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल त्वरित शासनाला सादर केला जाईल. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत १६ जुलैपर्यंत सुमारे १ लाख ११ हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून विमा हप्ता भरण्याची मुदत २३ जुलैपर्यंत वाढविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!