नागपूर

सांडपाण्यावरील प्रक्रियेतून बगिच्यांची देखभाल करणारे नागपूर पहिले शहर ठरणार : महापौर

दोन बगिच्यांमधील एस.टी.पी. प्लान्टचे भूमिपूजन : एकूण १२ बगिच्यात राबविणार प्रकल्प

नागपूर, ता. १७ : नागपूर शहरातील नाग आणि पिवळी नदीलगत असलेल्या सुमारे १२ बगिच्यांमध्ये छोटा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एस.टी.पी.) उभारून त्यातून शुद्ध होणाऱ्या पाण्याच्या वापर बगिच्यांमध्ये करण्यात येणार आहे. यामुळे नागपूरकरांच्या हक्काचे असलेल्या पिण्याच्या पाण्याची बचत होईल. एकाच वेळी अशा प्रकारचे १२ प्रकल्प उभारणारे नागपूर शहर हे देशातील पहिले शहर ठरणार असल्याचे प्रतिपादन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.

अशा दोन प्रकल्पांच्या कामाचे भूमिपूजन महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते शनिवारी (ता. १७) भोसले विहार कॉलनी येथील तुळशीबाग उद्यान आणि रतन विहार कॉलनी उद्यानात पार पडले. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमहापौर मनीषा धावडे, भाजपा शहर अध्यक्ष आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते, आमदार विकास कुंभारे, जलप्रदाय समिती सभापती संदीप गवई, स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे, माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक विजय(पिंटू)झलके, गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक, नगरसेविका सुमेधा देशपांडे, नेहा वाघमारे, कार्यकारी अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, मनोज गणवीर, सचिन रक्षमवार, वाहतूक अभियंता श्रीकांत देशपांडे, उपविभागीय अभियंता रुपराव राऊत, प्रकाश निर्वाण,राईट वॉटरचे संचालक अभिजित गान, माजी स्थायी समिती सभापती बंडू राऊत, माजी नगरसेवक राजू नागुलवार, डॉ. सुभाष राऊत, माजी नगरसेविका सारिका नांदूरकर, प्रभा जगनाडे, भाजपा मध्य नागपूरचे अध्यक्ष किशोर पलांदुरकर, विनायक डेहनकर, सुबोध आचार्य, अनिल मानापुरे, दशरथ मस्के, अॅड. विवेक सोनटक्के, धीरज चव्हाण, अमोल चंदनखेडे, प्रभाकर घुबे, नरेश वाघमारे, सोमु देशपांडे, विनोद आष्टीकर , शेषराव पाठराबे, भोसले विहार कॉलनीचे अध्यक्ष नीलमकुमार गजवानी उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, यावर्षी १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने हे १२ प्रकल्प उभारण्यात येणार असून १५ ऑगस्टपर्यंत तीन ते चार प्रकल्पांच्या कामाचे भूमिपूजन अपेक्षित आहे. अशा प्रकारचे एस.टी.पी. उभारण्यासाठी केंद्र सरकारने जापानच्या एका कंपनीला प्रमाणित केले असून त्याच कंपनीच्या माध्यमातून नागपुरात सदर प्रकल्प उभारण्यात येत आहे. यामुळे बगिच्यांना यथायोग्य पाणी मिळेल आणि पिण्याकरिता असणाऱ्या शुद्ध पाण्याची बचत होईल, असेही ते म्हणाले.

प्रकल्पाची क्षमता पाच हजार लिटर प्रतिदिन असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकल्पासाठी जलप्रदाय समितीचे सभापती संदीप गवई आणि माजी सभापती विजय झलके यांनी विशेष प्रयत्न केले.

यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी दोन्ही उद्यानातील कामाचे भूमिपूजन केले. या प्रकल्पामुळे उपयोगात न येणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार असल्याने आणि त्याचा उपयोग बगिच्यांच्या देखभालीसाठी करण्यात येणार असल्याने नागपूर शहर इतर शहरांसाठी आदर्श ठरणार आहे. यापूर्वी असाच मोठा सांडपाणी प्रक्रिया उभारून त्यातून शुद्ध होणारे पाणी वीज प्रकल्पांना पुरविण्यात येत आहे. आता उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पात जपानच्या झोकासू तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून लहान प्रकल्पातून बगिच्यांना तर मोठ्या प्रकल्पातून रस्ता दुभाजकांवरील झाडांना आणि इमारत बांधकामासाठी पाणी वापरता येणार आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची बचत होणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!