नागपूर

डेंग्यूच्या डासांवर प्रतिबंधात्मक उपायासाठी नागपुरात सुरू आहे धूरफवारणी 

नागपूर, ता. १७ : शहरात कीटकजन्य आजारांच्या रुग्णांच्या प्रमाणात वाढ होऊ नये याकरिता डासांची घनता कमी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता एकत्रित कीटक नियंत्रण उपाययोजनेचा भाग म्हणून शहरातील दहाही झोनमधील विविध परिसरात नागपूर महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाच्या वतीने धूरफवारणी करण्यात येत आहे.

महापौर दयाशंकर तिवारी आणि आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार आणि मार्गदर्शनात हिवताप व हत्तीरोग विभागाच्या अधिकारी दीपाली नासरे यांच्या नेतृत्वात धूरफवारणीचा झोननिहाय आणि दिवसनिहाय कृती कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. याअंतर्गत शनिवारी (ता. १७) शहरातील विविध भागात धूरफवारणी करण्यात आली. यावेळी मनपाच्या चमूने परिसरातील घराघरात जाऊन सर्वेक्षण केले. कुलरमध्ये, टायरमध्ये व अन्य ठिकाणी पाणी साचले आहे का, याची पाहणी केली. ज्यांच्या घरात पाणी साचले आहे त्यांना याबाबत सूचना देत होणाऱ्या दंडाची माहिती दिली. आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळण्याचे आवाहन करीत जनजागृती केली.

शनिवारी, लक्ष्मीनगर झोनमधील प्रभाग क्र. 36 क, ड अंतर्गत असलेल्या मनीष लेआऊट, सहकारनगर, नवीन सोनेगाव, इंद्रप्रस्थ नगर, पन्नासे लेआऊट, भामटी, भेंडे लेआऊट, भाऊसाहेब सुर्वेनगर, त्रिमूर्तीनगर येथे, हनुमाननगर झोनअंतर्गत असलेल्या प्रभाग क्र. 32 अ, ब अंतर्गत असलेल्या जुने ज्ञानेश्वर नगर, बजरंग नगर, जवाहर नगर, चक्रधर नगर, एन.आय.टी. उद्यान, शिर्डीनगर, रघुजीनगर येथे, धंतोली झोन अंतर्गत असलेल्या प्रभाग क्र. 33 क, ड अंतर्गत असलेल्या रामेश्वरी, कैलाश नगर, कुंजीलाल पेठ नगर, चंद्रनगर येथे धूरफवारणी करण्यात आली. यासोबतच नेहरूनगर झोनअंतर्गत असलेल्या प्रभाग क्र. 26 क, ड अंतर्गत शेषनगर, श्रीकृष्णनगर, शिवणकर नगर, दर्शन कॉलनी, लता मंगेशकर नगर, कामाक्षी सोसायटी, गांधीबाग झोनअंतर्गत असलेल्या प्रभाग क्र. 19 क, ड अंतर्गत असलेल्या जलालपुरा, चितारओळी, तीननल चौक, सुत मार्केट, सराफा ओळी, तीननल चौक खापेकर मोहल्ला, लकडगंज झोन अंतर्गत असलेल्या प्रभाग क्र. 25 क, ड अंतर्गत नवीन पारडी, भवानी माता परिसर, अंबेनगर, स्वागत नगर संपूर्ण परिसर, महाजनपुरा भांडेवाडी, गोंडपुरा आणि मंगळवारी झोनअंतर्गत असलेल्या जाफर नगर, बोरगाव, श्रीकृष्ण नगर, गजानन नगर, माता नगर, गिऱ्हे लेआऊट येथे मनपाच्या वतीने धूरफवारणी करण्यात आली. पुढील १० दिवस हा कार्यक्रम सुरू राहणार असून नागरिकांनी घरात साचलेले कुठल्याही साधनात साचलेले पाणी काढून ते कोरडे करावे. लारवा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!