महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सुचना

*संभाव्य तिसऱ्या लाटेत उद्योगक्षेत्र सुरळित सुरु राहील याचे काटेकोर नियोजन करा*

*कामगारांच्या पाँईंट टु पॉईंट वाहूतक व्यवस्थेसह उद्योगानजिक फिल्ड रेसीडन्सीएल एरिया निश्चित करा*

राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील उद्योजकांशी संवाद साधून कोरोनाच्या संभाव्यतिसऱ्या लाटेतही उद्योग सुरु राहतील यादृष्टीने काटेकोर नियोजन करावे, त्याचा एक परिपूर्ण आराखडा तयार करावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या कामगारांची राहण्याची व्यवस्था त्यांच्या उद्योगाच्या आवारात करण्याची तयारी पूर्ण करावी व ज्यांना हे करणे शक्य नाही त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सहकार्य करून अशा उद्योगांच्या कामगारांसाठी कंपन्यांच्या समन्वयातून उद्योगस्थळानजीक फिल्ड रेसिडन्शीयल एरिया निश्चित करण्यास सहकार्य करावे, कामगारांना त्यांच्या कामाच्या स्थळी जा- ये करण्यासाठी पाँईंट टू पॉईंट वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करावे अशा सुचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.  कोणत्याही परिस्थितीत तिसरी लाट राज्यात येऊच नये यासाठी प्रयत्न करतांना दुर्देवाने तिसरी लाट आली तर राज्यातील उद्योग सुरु राहिले पाहिजेत व त्यामाध्यमातून अर्थचक्र आणि जीवनचक्र याची गती कायम राहिली पाहिले असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधिकारी तसेच उद्योग क्षेत्रातील काही प्रतिनिधींशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, आरोग्य विभागाचे अपरमुख्य सचिव प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, आरोग्यसंचालक रामस्वामी यांच्यासह  पोलीस महासंचालक संजय पांडे,  सीआयआयचे पश्चिम विभागाचे चेअरमन त्यागराजन, महाराष्ट्र चेअरमन सुधीर मुतालिक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

*सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी तातडीने थांबवा*

आपण कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा समर्थपणे मुकाबला केला. अजून दुसरी लाट ओसरली नाही तोपर्यंत तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या कमी झाली असली तरी ती अजूनही साडे आठ हजार ते ९ हजारावर स्थिरावली आहे, अजूनही ती त्या खाली जातांना दिसत नाही, उलट काही जिल्ह्यात रुग्णसंख्या पुन्हा वाढतांना दिसत आहे ही चिंतेची बाब असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेतील  आपल्याला हा जो मधला काळ मिळाला आहे त्यात तिसरी लाट येऊच नये यासाठी किंवा दुर्देवाने आलीच तर त्याची तीव्रता कमी राहील यासाठी   अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यात कोरोना आरटीपीसीआर चाचण्या वाढवा, पर्यटनस्थळी होणारी गर्दी तातडीने थांबवा, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

*ऑक्सिजन निर्मिती वाढवा*

मुख्यमंत्री यावेळी बोलतांना पुढे म्हणाले की, आता जगातील अनेक देशात तिसरी लाट येण्यास सुरुवात झाली आहे, तसे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीरही केले आहे. ब्रिटनसारख्या देशात रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. ज्या देशात लसीकरण झाले त्या देशातही पुन्हा नव्याने रुग्णसंख्या वाढतांना दिसत आहे. याचाच अर्थ लस घेतली असली तरी आपल्याला कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करणे आताच्याच कालावधीसाठी नाही तर पुढील एक दोन वर्षासाठी आवश्यक आहे. केंद्र सरकारने ही तिसऱ्या लाटेसंदर्भात सर्व राज्यांना तशा सुचना दिल्या आहेत.  राज्यात आजघडीला १३०० मे.टन ऑक्सीजन निर्मिती होते. दुसऱ्या लाटेत आपली गरज १७५० मे.टनापर्यंत वाढली होती म्हणजे साधारणत: ५०० ते ५५० मे.टन ऑक्सीजन आपण इतर राज्यातून मागवला. पण आता तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या ६० लाखापर्यंत राहील असा अंदाज केंद्राने व्यक्त केला आहे. तसेच दर दिवशी ४००० ते ४५०० मे.टन ऑक्सीजनची महाराष्ट्राला गरज लागेल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. ही परिस्थिती पहाता राज्यातील ऑक्सीजन निर्मितीला वेग द्यावा, राज्यातील ऑक्सीजन साठा पुर्ण क्षमतेने भरावा अशा सूचनाही त्यांनी केल्या. कुठल्याही परिस्थितीत राज्यात दररोज ३ हजार मे.टन ऑक्सीजन निर्मिती होईल यादृष्टीने ऑक्सिजन निर्मितीच्या कामाला गती देण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

*कोरोना प्रतिबंधक नियमांची कडक अंमलबजावणी करा*

कुठल्याही परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ देऊ नका, रस्त्यावर फिरणारे नागरिक मास्क घालूनच फिरतील याची दक्षता घ्या,  ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे त्या क्षेत्राला कंटेंमेंट झोन जाहीर करून त्यात कोरोना प्रतिबंधक नियमांचे कडक पालन करा, गाव, वाड्या वस्तींवर लक्ष केंद्रीत करा, कोरोनामुक्त गाव संकल्पनेत चांगले काम होईल यादृष्टीने प्रयत्न करा, कोरोना विषाणुमध्ये बदल दिसत असेल तर जिनोम सिकवेन्सी करून घ्या अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

*मेहनतीवर पाणी पडू देऊ नका*

राज्याने एका दिवसात आठ लाख लोकांचे लसीकरण करून उच्चांक स्थापन केला असला तरी लस उपलब्धतेला मर्यादा आहे त्यामुळे लसीकरणास विलंब होत आहे, काही नागरिकांना तर अजून पहिला डोसही मिळाला नाही अशा स्थितीत वाढती रुग्णसंख्या, डेल्टा विषाणुचा उद्भव आणि तिसरी लाट धोक्याची ठरू शकते हे लक्षात घ्या, आतापर्यंत घेतलेल्या मेहनतीवर पाणी पडू देऊ नका असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले तसेच शासन या सर्व कामासाठी आपल्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही ही मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यांनी ऑक्सीजन निर्मितीसाठी तसेच उद्योग सुरळित सुरु राहावेत यासाठी उद्योजक करत असलेल्या सहकार्यासाठी आभार देखील मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!