
नागपूरात गरोदर व स्तनदा मातांच्या लसीकरणाला सुरूवात
नागपूर, ता.१६ : नागपूर महानगरपालिकेतर्फे शुक्रवार (ता.१६) गरोदर व स्तनदा मातांच्या लसीकरणाला सुरूवात करण्यात आलेली आहे.
शुक्रवारी मनपाच्या पाचपावली सूतिकागृह येथे शुक्रवारी गरोदर व स्तनदा मातांचे लसीकरण करण्यात आले. याशिवाय डागा रुग्णालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे सुद्धा लवकरच गरोदर व स्तनदा मातांचे लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
गर्भवती व स्तनदा मातांचे समुपदेशन करुन त्यांची इच्छा असल्यास त्यांच्याकरिता लसीकरणाची स्वतंत्र व्यवस्था असावी, या उद्देशाने ही केंद्र लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
गर्भवती मातांना लस द्यावी अथवा नाही याबाबत संभ्रमाची स्थिती होती. यापूर्वी केंद्र शासनानेही त्यासंदर्भात आवश्यक निर्देश दिले नव्हते. मात्र २ जुलै २०२१ रोजी केंद्र शासनाद्वारे यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. त्यानुसार नागपूर महानगरपालिका प्रशासनाद्वारे ही सुविधा करण्यात आली. जास्तीत जास्त गर्भवती व स्तनदा मातांनी या सुविधेचा लाभ घ्यावा व लवकरात लवकर आपले लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर यांनी केले आहे.