
4 कोटी 20 लाखाची संपत्ती जप्त,इडीचा अनिल देशमुख यांना दणका
माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाखांची संपत्ती सक्तवसुली संचलनालयानं जप्त केली आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई पोलीस दलाचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दर महिन्याला १०० कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप सिंग यांनी केला होता. या प्रकरणाचा तपास ईडीकडून सुरू आहे.
या कारवाईवरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार जुंपली आहे. ‘आता केवळ ४ कोटी २० लाख रुपये जप्त झाले आहेत. लवकरच १०० कोटी जप्त होतील आणि देशमुखांवरदेखील जप्ती येईल’, असा दावा करत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी देशमुखांच्या अटकेचे संकेत दिले. त्याला राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं. ईडी स्वायत्त संस्था आहे ना? मग त्यांच्या कारवाईची माहिती सोमय्यांना आधीच कशी मिळते? ते इतक्या विश्वासानं दावे कसे काय करतात? असे प्रश्न शिंदेंनी उपस्थित केले. ईडीनं सोमय्यांना वकिलपत्र दिलंय का असा सवालदेखील त्यांनी विचारला.