नागपूर

पद्मभूषण डॉ. विजय भटकर आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा’ इमारत बांधकामासंबंधी कार्यवाही तातडीने सुरू करा

नागपूर, ता. १५ : नागपूर शहरातील मनपा व इतर सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जाणीवा समृद्ध करून त्यांच्या कल्पनांना बळ देणारी आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा व संशोधन केन्द्र नागपूर शहरात साकारणार आहे. देशाला परम हे महासंगणक देणारे पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या नावाने साकारणारी विज्ञान प्रयोगशाळा लवकरात लवकर पूर्ण होउन विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा यासाठी या इमारतीच्या बांधकामासंदर्भात आवश्यक कार्यवाही तातडीने सुरू करा, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.

‘पद्मभूषण डॉ. विजय भटकर आधुनिक विज्ञान प्रयोगशाळे’च्या संपूर्ण संकल्पनेसंदर्भात मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये गुरूवारी (ता.१५) विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीत महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे, स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नरेंद्र (बाल्या) बोरकर, नगरसेवक विजय (पिंटू) झलके, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, उपायुक्त विजय देशमुख, उपायुक्त मिलींद मेश्राम, शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर, असोसिएशन फॉर रिसर्च अँड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशन चे सुरेश अग्रवाल, डॉ. शार्दूल वाघ आदी उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरामध्ये अपूर्व विज्ञान मेळावा आयोजित करण्यात येतो. विद्यार्थ्यांच्या कल्पनांना वास्तविक आकार देउन त्यांच्या वैज्ञानिक संकल्पना साकार करणारा हा मेळावा संपूर्ण राज्यामध्ये ख्यातीप्राप्त आहे. खेळातून विज्ञान शिकणारे मनपाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरही आपली छाप सोडली आहे. मात्र हे केवळ यापूरताच मर्यादित न राहता शहरातील विद्यार्थ्यांना वर्षभर एकाच छताखाली साध्या, सोप्या आणि सहजरित्या विज्ञान शिकता यावे यासाठी ‘पद्मभूषण डॉ. विजय भटकर आधुनिक विज्ञान प्रयोगशाळे’ची संकल्पना मांडण्यात आल्याचे यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले. या प्रयोगशाळेच्या निर्मितीसाठी गरोबा मैदान येथील मनपाच्या बंद पडलेल्या शाळेच्या इमारत परिसराची निवड करण्यात आलेली आहे. सर्व आवश्यक कार्यवाही करून ही जागा निश्चित करण्यात आलेली आहे.

भविष्याचा मागोवा घेता व विद्यार्थ्यांच्या हिताच्या तसेच शहरातील नागरिकांनाही विज्ञानाचे महत्व कळावे, राज्यातीलच नव्हे देशातील शिक्षकांना विज्ञानाचे उत्तम प्रशिक्षण मिळावे यासाठी ही केवळ प्रयोगशाळा न राहता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधन केंद्र व्हावे, अशी संकल्पना यावेळी सुरेश अग्रवाल यांनी मांडली. त्यानुसार इमारत बांधकाम व्हावे, अशी मनीषाही त्यांनी व्यक्त केली.

भविष्याच्या दृष्टीने हे केंद्र भव्य स्वरूपात असावे यादृष्टीने येथे विज्ञान, गणित, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र अशा विविध विषयाकरिता स्वतंत्र दालन निर्माण केले जावे. यासाठी जुनी इमारत पाडण्याची गरज असल्यास तसा अहवाल देण्यात यावा. संपूर्ण इमारतीमध्ये अग्निशमन उपकरणे बसविण्यात यावी. पार्कींगसाठी मोठी जागा असावी, प्रशिक्षणासाठी सभागृहाची सुद्धा व्यवस्था असावी, अशा स्वरूपाचे एकूणच आर्कीटेक्चरल डिझाईन तयार करून ते मंजुर करण्याबाबत आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात यावी, असे निर्देशही यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.

विशेष म्हणजे, संपूर्ण प्रकल्प मनपाचा असून इमारत व येथे आवश्यक साहित्याची उपलब्धता झाल्यानंतर मनपाद्वारे हे प्रकल्प संचालनासाठी असोसिएशन फॉर रिसर्च अँड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशन या संस्थेकडे हस्तांतरीत केले जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!