नागपूर

डेंग्यू रुग्णाच्या निवासाजवळील ५०० घरांचे सर्वेक्षण करा : मनपा आयुक्त राधाकृष्णन बी

डेंग्यू नियंत्रणासाठी दररोज आढावा घेण्याचेही आयुक्तांचे निर्देश

नागपूर, ता. १५ : नागपूर शहरात डेंग्यूबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहरात डेंग्यू नियंत्रण करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे प्रत्येक झोनमध्ये डेंग्यू रुग्णांच्या घराजवळील ५०० घरांचे सर्वेक्षण करा, असे सक्त निर्देश मनपा आयुक्त  राधाकृष्णन बी. यांनी दिले. डेंग्यू नियंत्रणासाठी मनपा आता ॲक्शन मोडवर आली आहे. यासंदर्भात सर्व अतिरिक्त आयुक्त व सहायक आयुक्तांनी दररोज आढावा घेण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत.

शहरात डेंग्यू रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मनपा आयुक्तांनी डेंग्यू संदर्भात मनपाद्वारे राबविण्यात येणा-या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आयुक्त सभाकक्षात विशेष बैठक घेतली. बैठकीत अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीणा, राम जोशी, संजय निपाणे, उपायुक्त राजेश भगत, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी, मलेरिया, फायलेरिया अधिकारी दीपाली नासरे, सहायक आयुक्त सर्वश्री गणेश राठोड, प्रकाश वराडे, हरीश राउत, अशोक पाटील, विजय हुमने, घनश्याम पंधरे, सहायक आयुक्त किरण बगडे, साधना पाटील, सुषमा मांडगे यांच्यासह सर्व झोन अधिकारी व मलेरिया, फायलेरिया निरीक्षक उपस्थित होते.

यावेळी मनपा आयुक्तांनी सांगितले की, ज्या भागात डेंग्यूची रुग्णसंख्या जास्त आढळत आहे त्या भागातल्या प्रत्येक घरांचे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. डेंग्यूची अळी (लारवा) ही स्वच्छ पाण्यामध्ये वाढते त्यातूनच डासांची पैदास होते. त्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये सर्वेक्षण करुन कुठेही पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. फ्लॉवर पॉट, कुलरची टाकी, टायर, वाहन दुरुस्ती करणा-या व अन्य ज्या ठिकाणी पाणी साचून असते ते रिकामे करुन कोरडे करायला लावा. याबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करावी, असेही त्यांनी सांगितले.

आयुक्तांनी डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश दिले तसेच हायरिस्क भागाची यादी तयार करुन तिथे फीवर क्लीनिक सुरु करण्याचे आदेश दिले. तसेच डेंग्यू प्रभावित भागातील नागरिकांचे सिरम सॅम्पल गोळा करण्याची सूचना दिली. आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावे आणि लहान मुलांची काळजी घ्यावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

आयुक्तांनी खाजगी रक्त तपासणी लॅबकडून डेंग्यूच्या रुग्णांची माहिती पाठविण्यासाठी त्यांना सूचना देण्याचे आदेश दिले. तसेच झोनमधील मलेरिया, फायलेरिया कर्मचा-यांद्वारे झोनमध्ये करण्यात येणारे दैनंदिन सर्वे, त्यात लारवा आढळणारी घरे, डेंग्यू संशयीत व पॉझिटिव्ह रुग्ण, डासोत्पत्ती स्थाने शोधणे व त्यात आवश्यक उपाययोजना करणे आदींबाबत दैनंदिन माहितीचा अहवाल दररोज तपासून कर्मचा-यांच्या कार्याचा पाठपुरावा घेत राहण्याचे निर्देश आयुक्तांनी सर्व झोन सहायक आयुक्तांना दिले.

अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी गप्पी माशांचे प्रजनन केंद्र वाढविण्याचे निर्देश दिले. सद्यस्थितीत १७० गप्पी मासे केंद्र आहेत. प्रत्येक झोनमध्ये किमान १० केंद्र उघडण्याची सूचना त्यांनी सहायक आयुक्तांना केली.जोशी यांनी झीका साथीबद्दल माहिती देतांना सर्वांना यासाठी तयार राहण्याचे निर्देशही दिले. नागरिकांनी त्यांचे घरातील कुलर्स, टायर, कुंडया किंवा अन्य बाबी ज्यामध्ये पाणी साचू शकेल ते काढून घेण्याचे आवाहन केले. तसेच साचलेल्या पाण्यांवर ऑईल स्प्रे करावे किंवा महानगरपालिके तर्फे करुन घेण्यास सहकार्य करावे, असे आवाहन केले.

मलेरिया-फायलेरिया अधिकारी दीपाली नासरे यांनी सांगितले की, १ जुलै ते १३ जुलैपर्यंत डेंग्यूचे ८२ रुग्ण मिळाले आहेत. विभागाच्या कर्मचा-यांनी सर्व झोन मिळून जून महिन्यात ६६९०३ घरांची तपासणी केली. त्यामध्ये एकूण १५७१ घरांमध्ये डेंग्यूची अळी मिळाली. विभागाच्या कर्मचा-यांनी कुलर, टिन कंटेनर, कुंडी, नांद, सीमेंट टाके, प्लास्टिक भांडे, मातीची भांडी, टायर व फूलदाणीची तपासणी केली. मनपा कर्मचा-यांना तपासणी दरम्यान सर्व झोन मिळून जूनमध्ये एकूण १,४३,०७९ डासोत्पत्ती स्थाने मिळाले. यामधून ८५४२८ डासोत्पत्ती स्थानावर कारवाई करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!