नागपूर

वारंवार अळी (लारवा) आढळल्यास दंडात्मक कारवाई करा : महापौर तिवारी

नागपूर महानगरपालिकेच्या मलेरिया, फायलेरिया विभागाच्या कर्मचा-यांद्वारे करण्यात येणा-या गृह सर्वेक्षणामध्ये एखाद्या घरामध्ये वारंवार केलेल्या सर्वेक्षणात डेंग्यूची अळी (लारवा) कायम दिसून आल्यास संबंधित घरमालकावर दंडात्मक कारवाई करा, असे सक्त निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले आहेत. तसेच ज्या घराच्या बेसमेंट मध्ये पाणी साचत आहे आणि त्याच्यातून डासोत्पत्ती होत आहे अश्या बेसमेंटच्या मालकांवर सुध्दा कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

शहरात डेंग्यू रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महापौरांनी डेंग्यू संदर्भात मनपाद्वारे राबविण्यात येणा-या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक बोलाविली. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये झालेल्या बैठकीत आरोग्य समिती सभापती महेश (संजय) महाजन, उपायुक्त राजेश भगत, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी, मलेरिया- फायलेरिया अधिकारी दीपाली नासरे, सहायक आयुक्त सर्वश्री गणेश राठोड, प्रकाश वराडे, हरीश राउत, अशोक पाटील, विजय हुमने, घनश्याम पंधरे, सहायक आयुक्त किरण बगडे, साधना पाटील, सुषमा मांडगे यांच्यासह सर्व झोन अधिकारी व मलेरिया, फायलेरिया निरीक्षक उपस्थित होते.

मलेरिया-फायलेरिया अधिकारी दीपाली नासरे यांनी सांगितले की १ जुलै ते १३ जुलैपर्यंत डेंग्यूचे ८२ रुग्ण मिळाले आहे. विभागाच्या कर्मचा-यांनी सर्व झोन मिळून जून महिन्यात ६६९०३ घरांची तपासणी केली. याच्यातून एकूण १५७१ घरांमध्ये डेंग्यूची अळी मिळाली. विभागाच्या कर्मचा-यांनी कूलर, टीन कंटेनर, कुंडी, नांद, सीमेंट टाके, प्लास्टिक भांडे, मातीची भांडी, टायर व फूलदाणी ची तपासणी केली. मनपा कर्मचा-यांना तपासणी दरम्यान सर्व झोन मिळून जूनमध्ये एकूण १,४३,०७९ डासोत्पत्ती स्थान मिळाले. यामधुन ८५४२८ डासोत्पत्ती स्थानावर कारवाई करण्यात आली.

डेंग्यूची अळी (लारवा) ही स्वच्छ पाण्यामध्ये वाढते त्यातूनच डासांची पैदास होते. त्यामुळे नागरिकांनी घरामध्ये कुठेही पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. फ्लॉवर पॉट, कुलरची टाकी व ज्या अन्य ठिकाणी पाणी साचून असते ते रिकामे करून कोरडे करून ठेवावे, असे नागरिकांना आवाहन करतानाच प्रशासनाद्वारे डेंग्यूबाबत जनजागृतीसाठी आवश्यक कार्यवाही करण्याचेही निर्देश याप्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.

घरांसोबतच झोनमध्ये असलेले रिकामे भूखंड तसेच अन्य डासोत्पत्ती केंद्रांमध्ये आवश्यक औषधांची वारंवार फवारणी करणे, तलाव वा डबक्यांमध्ये गप्पी मासे सोडणे आदी बाबत कार्यवाहीला गती देण्याचेही महापौरांनी निर्देशित केले. शहरातील नदी स्वच्छता अभियानादरम्यान नदीमधून काढण्यात येणारा गाळ झोनमध्ये ज्या ठिकाणी खड्डे आहेत अशा सर्व ठिकाणी नेउन टाकल्यास खड्डे भरून निघतील शिवाय त्यामुळे पाणीही साचणार नाही व त्यातील डासोत्पत्ती सुद्धा बंद होईल, यासंदर्भात प्रशासनाद्वारे पुढील वर्षात कार्यवाही करण्याचे त्यांनी निर्देश दिले. त्यांनी प्रत्येक झोनमध्ये फॉगिंग मशीनची संख्या वाढविण्याचे निर्देश विभागाला दिले.

रिकाम्या भूखंडामध्ये डासोत्पत्ती होते. अशा ठिकाणी औषध फवारणी करुन संबंधीत भूखंड मालकावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी व भूखंडातील कचरा साफ करून डासोत्पत्ती होणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही निर्देश महापौरांनी दिले. नेहरूनगर झोनमध्ये एका कंत्राटदाराद्वारे दोन मोठे खड्डे करण्यात आल्याने तिथे पाणी साचले असल्याचे निदर्शनास येताच झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे कारवाई करून संबंधित कंत्राटदाराकडून दंड वसूल करण्यात आल्याची माहिती यावेळी मलेरिया, फायलेरिया निरीक्षकाद्वारे देण्यात आली. झोन पथकाच्या या कामगिरीबद्दल महापौर दयाशंकर तिवारी यांनी अभिनंदन केले.

झोनमधील मलेरिया, फायलेरिया कर्मचा-यांद्वारे झोनमध्ये करण्यात येणारे दैनंदिन सर्वे, त्यात लारवा आढळणारी घरे, डेंग्यू संशयीत व पॉझिटिव्ह रुग्ण, डासोत्पत्ती केंद्र शोधणे व त्यात आवश्यक उपाययोजना करणे आदींबाबत दैनंदिन माहितीचा अहवाल दररोज तपासून कर्मचा-यांच्या कार्याचा पाठपुरावा घेत राहण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी सर्व झोन सहायक आयुक्तांना दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!