
सोनाळा येथे ड्रोनद्वारे गावठाण मोजणीच्या कामाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
* स्वामित्व योजनेंतर्गत सर्व गावठाणांची होणार मोजणी
वाशिम, दि. १४ (दिपक भारूका) : जिल्ह्यात स्वामित्व योजनेअंतर्गत सर्व गावठाणाची ड्रोनद्वारे मोजणीस सुरुवात झाली आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील ७३ गावांचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण पुर्ण झाले आहे. सर्व्हे ऑफ इंडियाच्या सहाय्याने आज, १४ जुलै रोजी मालेगांव तालुक्यातील सोनाळा येथे गावठाणातील मिळकतीचे ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण सुरु असतांना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी भेट देवून कामाची पाहणी केली.
यावेळी त्यांच्यासमवेत सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सचिन इंगळी, सर्व्हे ऑफ इंडियाचे हबीब खान, मालेगावचे तहसिलदार रवि काळे उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये स्वामित्व योजनेअंतर्गत ड्रोनद्वारे गावठाण मोजणी करण्यात येणार आहे, त्या गावातील नागरिकांना या योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या सर्व्हेक्षणाची माहिती द्यावी. गावात दवंडी देवून ग्रामस्थांना या सर्व्हेक्षणाचे महत्व पटवून देवून सहभागी करुन घ्यावे. संबंधित तहसीलदार व गट विकास अधिकारी यांनी व्यक्तीश: या सर्व्हेक्षणात लक्ष देवून प्रत्येक गावठाण मोजणी यशस्वी करावी.
स्वामित्व योजनेअंतर्गत राज्यातील सर्व गावाच्या गावठाणामधील जमीनीचे जीआयएस प्रणालीव्दारे सर्व्हेक्षण व भूमापन करण्यात येणार आहे. यामाध्यमातून गावठाण भूमापन न झालेल्या गावातील मिळकतीचे जीआयएस प्रणालीवर आधारित मालमत्ता पत्रक तयार करण्यात येणार आहे. सदर नकाशातील मिळकतींना (जीआयएस डाटा) ग्रामपंचायतमधील मिळकत रजिस्टर जोडण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती, उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती आणि मंडळ अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गावस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.
स्वामित्व योजनेअंतर्गत ड्रोनद्वारे गावठाण मोजणीमुळे मिळकतीचा नकाशा तयार होईल. सीमा निश्चित होतील. त्यामुळे मिळकतीचे नेमके क्षेत्र माहिती होईल. मालकी हक्काची अभिलेख मिळकत पत्रिका तयार होईल. त्यामुळे ग्रामस्थांच्या नागरी हक्कांचे संवर्धन होण्यास मदत होईल. मिळकत पत्रिका तयार झाल्यामुळे घरावर कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध होईल. मिळकतींना बाजारपेठेमध्ये तरलता येवून गावाची आर्थिक पत उंचावण्यास मदत होईल.
ग्रामपंचायतीला गावठाणातील प्रत्येक मिळकतीचे मालकी हक्काचे अभिलेख मालमत्ता पत्रक तयार होईल. ग्रामपंचायतीला गावातील कर आकारणी, बांधकाम परवानगी, अतिक्रमण निर्मुलन यासाठी अभिलेख व नकाशा उपलब्ध होईल. त्यामुळे नियोजन करण्यास सोय व सुलभता निर्माण होईल. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ता ह्या मालमत्ता कराच्या व्याप्तीत येतील. त्यामुळे ग्रामपंचायत महसुलात वाढ होईल. ग्रामपंचायतीकडील मालमत्ता कर निर्धारणपत्र (नमुना-८) आपोआप तयार होईल. हस्तांतरणाच्या नोंदी अद्यावत करणे सहज, सुलभ व पारदर्शक होईल. गावठाण हद्दीतील ग्रामपंचायत, शासनाच्या सार्वजनिक व प्रत्येक मिळकतीच्या सीमा व क्षेत्र निश्चित केले जातील. त्यामुळे गावठाणातील मिळकतीच्या हद्दी व क्षेत्राचे वाद कमी होतील.
*******