
नागपूरच्या भावेशची ‘इंडिया बुक’मध्ये नोंद
नागपूर, ता. 13 : उपराजधानीतील युवा बाईक रायडर भावेश साहूने दुचाकीने चार दिवसांत तब्बल सहा हजार किमी अंतर यशस्वीरित्या पूर्ण करीत प्रतिष्ठेच्या ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये आपले नाव नोंदविले आहे. असा बहुमान मिळविणारा तो नागपूर व विदर्भाचा पहिला रायडर ठरला आहे.
२५ वर्षीय भावेशने गेल्या मार्चमध्ये लागोपाठ चार दिवस ‘नॉनस्टॉप’ बाईक चालवत दिल्ली, कोलकाता, चेन्नई, मुंबईमार्गे परत दिल्ली असा सहा हजार ४४ किमीचा सुवर्ण चतुष्कोण (गोल्डन कॉड्रलॅटरल) त्याने ९१ तासांत पूर्ण करून अनोखा विक्रम केला होता. त्याच्या या विक्रमाची नोंद नुकतीच ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये झाली असून, तसे प्रमाणपत्रही त्याला प्राप्त झाले आहे. याआधीचा ८७ तास ४२ मिनिटांचा विक्रम मुंबईच्या शोबित सरकारच्या नावावर होता. भावेशने हे साहसी अभियान ७५ तासांच्या आत पूर्ण केले असते तर, त्याचे नाव ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्येही न नोंदले गेले असते. दुर्दैवाने मार्गात दुचाकी खराब झाल्याने त्याचे ‘लिम्का बुक’चे स्वप्न अपूर्ण राहिले. ‘इंडिया बुक’मध्ये अधिकृत नोंद झाल्याबद्दल भावेशने आनंद व्यक्त केला असून, भविष्यात ‘लिम्का बुक’साठी पुन्हा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
एमबीएपर्यंत शिक्षण घेतलेल्या भावेशने अभियानाची सुरूवात दिल्ली येथून २८ मार्च रोजी केली होती. कुठेही मुक्काम न करता दिवसरात्र बाईक प्रवासादरम्यान भावेशने कुठेही मुक्काम न करता १३ राज्यांतील एकूण ८२ शहरांमधून बाईक चालविली होती. त्याने खाणेपिणेही चालत्या बाईकवरच केले होते. सुरक्षेसाठी विशिष्ट सूट, सेफ्टी गिअर व जीपीएस सिस्टीमची मदत घेतली होती. या अभियानाच्या निमित्ताने त्याने भारतियांना हेल्मेट घालण्याचा व सुरक्षित वाहने चालविण्याचा जागोजागी संदेश दिला. लहानपणापासून बाईकिंगचा शौक असलेल्या भावेशने दुचाकीने आतापर्यंत डझनभर राईड्सच्या माध्यमातून ४४ हजार किमी अंतर कापले असून, भूतान, लडाख, नेपाळ व म्यानमार सीमेपर्यंत बाईक रायडिंग केले आहे.
…प्रतिष्ठेच्या ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद होणे, ही माझ्यासाठी अत्यंत आनंद व अभिमानाची बाब आहे. भविष्यात आणखी नवनवीन साहसी मोहिमा पूर्ण करून उपराजधानीला नावलौकिक मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे’
–भावेश साहू, बाईक रायडर