नागपूर

नागपूरात बालकांच्या न्युमोकॉकल लसीकरण मोहिमेचा मंगळवारपासून शुभारंभ

फुटाळा आरोग्य केंद्रातून होणार मोहिमेची सुरूवात

नागपूर, ता.१२ : बालकांमध्ये होणारे न्यूमोकॉकल आजार आणि त्यामुळे होणारे बालमृत्यू रोखण्याच्या दृष्टीने नागपूर शहरात बालकांच्या न्यूमोकॉकल कांज्यूगेट (Pneumococcal conjugate) लसीकरणाचा मंगळवार (ता.१३ जुलै)पासून शुभारंभ होत आहे. फुटाळा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सकाळी १० वाजता महापौर दयाशंकर तिवारी या लसीकरण मोहिमेची सुरूवात करतील. विशेष म्हणजे मनपाद्वारे बालकांना ही लस नि:शुल्क देण्यात येणार आहे.

या लसीकरण मोहिमेच्या अंमलबजावणी संदर्भात सोमवारी (ता.१२) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये टास्क फोर्स समितीची विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीत अतिरिक्त आयुक्त राम जोशी, डॉ. साजीद खान (SMO), वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर व डॉ. नरेन्द्र बहिरवार प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी डॉ. साजीद खान (SMO) यांनी न्यूमोनिया आजाराबाबत तसेच लसीबाबत मार्गदर्शन केले.

अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी बालकांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पालकांनी आपल्या बाळांना ही लस देण्याचे आवाहन केले.

न्युमोकॉकल लसीकरण मोहिम राज्यात सर्वच ठिकाणी राबविली जाणार आहे व यामध्ये शासनाच्या सुचनेप्रमाणे बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे. पी.सी.व्ही. लसीकरण केल्यास बालकांमधील न्युमोकॉकल आजार व त्यामुळे होणारे बालमृत्यू टाळण्यास मदत होईल.

गंभीर न्युमोकॉकल आजार : होण्याचा धोका दोन वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये दिसून येतो. या लसीमुळे गंभीर न्युमोकॉकल आजारापासून बाळाचे संरक्षण तर होईलच सोबत समाजातील इतर घटकांमध्ये न्युमोकॉकल आजाराचा धोका कमी होण्यास मदत होईल.

न्युमोकॉकल न्युमोनिया काय आहे?

न्युमोकॉकल आजार म्हणजे Streptococcus Pneumoniae या बॅक्टेरीयामुळे होणारा आजार आहे. StreptococcusPneumoniae हा बॅक्टेरीया 5 वर्षाच्या आतील मुलांमधील न्युमोनियाचे प्रमुख कारण आहे.

आजाराची लक्षणे :

ह्या आजाराची मुख्य लक्षणे खोकला, ताप येणे, धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी आहेत. ही लक्षणे आढळून आल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर यांनी केले आहे.

ही लस नागपूर शहरातील दवाखान्यातील एकूण 53 लसीकरण केंद्रावर व 987 बाह्य सत्रांमध्ये ही लस देण्यात येईल. लस पूर्णपणे सुरक्षित असून लसीचा पहिला डोस दीड महिना पहिला पेंटासोबत, दुसरा डोस साडेतीन महिने तिस-या पेंटासोबत व तिसरा बुस्टर डोस 9 महिन्यात एम. आर. सोबत देण्यात येईल.

टास्क फोर्स समितीच्या सभेमध्ये डॉ. विजय जोशी, डॉ.साजीद खान, डॉ.रवि धकाते, डॉ.अर्चना कोठारी, डॉ.मंजूषा गिरी, डॉ. ज्योत्सना देशमुख, डॉ. अर्शिया शेख, डॉ.कृपाली लिल्लारे यांच्यासह सर्व झोनल अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!