
आज फोटोला चपलांचा हार घातलांय.. उद्या तुमच्या गळ्यातही घालू; शिवसैनिक आक्रमक
आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर बेशरमचे झाड लावण्याची घोषणा केली होती. मात्र, आमदार रवी राणांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी आधी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या घरासमोर झाड लावून दाखवावे, नंतर मातोश्रीवर झाड लावण्याच्या बाता माराव्यात, असा इशारा देत परतवाडा येथील शिवसैनिकांनी रवी राणा विरोधात आंदोलन केले. रविवारी करण्यात आलेल्या आंदोलना दरम्यान शिवसैनिकांनी आमदार रवी राणा यांच्या फोटोला चपलांचा हार घातला. तसेच आज फक्त फोटोला हार घातला, उद्या तुमच्या गळ्यात चपलांचा हार घालायला शिवसेना मागेपूढे पाहणार नाही, असा इशाराही परतवाडा शहरातील शिवसैनिकांनी आमदार रवी राणा यांना दिला आहे.
आमदार रवी राणा यांच्या विरोधात परतवाडा येथील आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी आंदोलना दरम्यान राणा दाम्पत्यावर सडकडून टीका केली आहे. केंद्रात नुकताच मंत्रिमंडळ विस्तार पार पडला, ज्याप्रकारे राज्यातील चार नेत्यांना केंद्रात मंत्रीपद मिळाले. केंद्राने विशेषत: शिवसेनेला टारगेट करण्यासाठी नारायण राणे, कपिल पाटील यांना मंत्रिपदाचे बळ दिले असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे, त्याच पद्धतीने खासदार राणा यांना आपल्यालाही मंत्रीपद मिळेल या आशेने आमदार रवी राणा आणि नवनीत राणा हे मुख्यमंत्र्यांवर टीका करत असतात, असा आरोप देखील शिवसैनिकांनी केला आहे.