
आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर सातही दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहणार
• शेतकऱ्यांना पीक विमा हप्ता भरण्यासाठी सुविधा
वाशिम, दि. ०९ : जिल्ह्यात सध्या लागू असलेल्या निर्बंधांनुसार शनिवार, रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा, दुकाने, आस्थापना बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, सध्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी विमा हप्ता भरण्याची कार्यवाही सुरु असून या योजनेत सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्यांनी १५ जुलैपर्यंत विमा हप्ता भरणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर निर्बंध कालावधीत सातही दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकरी षण्मुगराजन एस. यांनी ७ जुलै २०२१ रोजी निर्गमित केले आहेत.
या आदेशानुसार जिल्ह्यात महाऑनलाईन व ग्रामपंचायत येथील आपले सरकार सेवा केंद्र व कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) आता शनिवारी व रविवारी सुरु ठेवण्यास व आदेशाच्या कालावधीत रात्री १० वाजेपर्यंत कामकाज सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच पीक विमा भरण्यासाठी येणारे शेतकरी व त्यांच्या वाहनांना संचारबंदीतून सूट देण्यात आली आहे. सदर आदेश १२ जुलै २०२१ पर्यंत लागू राहणार आहेत.