
वर्धेत दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना 5 लक्ष रुपये मुदत ठेव योजनेचा लाभ देण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश
जिल्ह्यात एक व दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना बाल संगोपन योजनेचा लाभ मंजूर करण्याच्या सूचना
कोरोना महामारीमारीमुळे जीवनाचे सर्व आयाम बदलले आहेत. अनेकांनी आपले नातेवाईक गमावले तर मुलांनी पालक गमावले आहेत. यात लहान मुलांची परवड होत आहे. म्हणूनच कोविड सोबतच इतर कारणांनी दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना राज्य शासनाने अर्थसहाय्य देण्याची योजना लागू केली आहे. यामध्ये मुलाच्या नावे 5 लक्ष रुपये एक रकमी मुदत ठेव करण्यात येते. जिल्ह्यातील दोन्ही पालक गमावलेल्या अशा मुलांना या योजनेचा लाभ द्यावा अशा सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिल्यात.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोविडमुळे अडचणीत सापडलेल्या बालकांच्या संरक्षणासाठी गठीत जिल्हास्तरीय कृती दलाची दुसरी बैठक आज पार पडली यावेळी जिल्हाधिकारी बोलत होत्या. या बैठकीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव निशांत परमा, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील मेसरे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, बाल कल्याण समिती अध्यक्ष सचिन आष्टीकर, शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ मंगेश घोगरे, शिक्षणाधिकारी प्राथमिक लिंबाजी सोनवणे, चाईल्ड लाईन जिल्हा समन्वयक आशिष मोडक, डॉ संदीप नखाते, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी माधुरी भोयर उपस्थित होते.
दोन्ही पालक गमावलेल्या मुलांचा ताबा ज्यांच्याकडे आहे अशा पालकांनी किंवा बालगृहात असल्यास बालगृह अधीक्षकांनी अशा मुलांना सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
अनाथ झालेल्या मुलांच्या आईवडीलांचे रेशन कार्ड असल्यास ते चालू ठेवता येईल. मुले नातेवाईकांकडे दुसऱ्या जिल्ह्यात राहत असल्यास रेशनकार्ड पोर्ट करून घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. कोविडमुळे दोन्ही पालक व एक पालक गमावलेल्या सर्व मुलांचे राष्ट्रीयकृत बँकेत शून्य बचत खाते उघडण्यासाठी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांच्या कडे पाठपुरावा करावा. तसेच अशा मुलांच्या पालकांच्या नावे कर्ज असल्यास ते माफ करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कडून निःशुल्क वकील उपलब्ध करून घ्यावे.
मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ही मुले ज्या शाळेत शिकत आहेत त्यांची यादी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना देण्यात यावी. शिक्षणाधिकाऱयांनी यासंदर्भात शिक्षण शुल्क नियमानुसार जेवढे शुल्क ठरवले असेल त्यानुसार संबंधित शाळेला पत्र देऊन शिक्षण शुल्क माफ करण्याची कार्यवाही करावी.
बालगृहात असलेल्या मुलांचे शिक्षण सुरू राहावे यासाठी शिक्षण विभागाने महिला व पुरुष शिक्षकांची सेवा बालगृहात देण्याची कार्यवाही करावी. तसेच त्यांची नियमित आरोग्य तपासणी व समुपदेशन करण्यात यावे.
जिल्ह्यात कोविडमुळे एक पालक गमावलेले 364 बालक आहेत, यापैकी 195 मुलगे तर 169 मुली आहेत. तर दोन्ही पालक गमावलेले 6 बालक आहेत. अशा सर्व बालकांना शासनाने लागू केलेल्या बालसंगोपान योजनेचा लाभ लवकरात लवकर देण्यात यावा अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.