
अनिल देशमुख यांच्या नंतर मुलालाही समन्स, ईडीच्या हाती महत्त्वाचे पुरावे
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचा अडचणी वाढत असून त्यांच्या पाठोपाठ त्यांचा मुलगा ऋषिकेश ही ईडीच्या रडारवर आला आहे
मुलगा ऋषिकेश देशमुख यांना ईडीने समन्स पाठवलं आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात हे समन्स बजावण्यात आलंय. त्यांना मंगळवारी (6 जुलै रोजी) चौकशीसाठी ईडी कार्यलयात हजर राहण्यास सांगण्यात आलंय. ऋषिकेश देशमुख यांना पाठवण्यात आलेलं हे पहिलं समन्स आहे (ED summons Rushikesh Deshmukh son of Anil Deshmukh in money laundering case).
अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ ऋषिकेश देशमुख यांनाही समन्स आल्यानं चर्चांना उधाण आलंय. अनिल देशमुख यांना समन्स पाठवण्यात आल्यानंतर आता ऋषिकेश देशमुख यांना समन्स पाठवण्यात आल्यानं पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. दोघांना वेगवेगळ्या तारखांचं समन्स बजावण्यात आलंय. ऋषिकेश देशमुख यांना 6 जुलै, तर अनिल देशमुख यांना 5 जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स आहे.
“मनी लाँडरिंगच्या गुन्ह्यात ऋषिकेश देशमुख याचा हात”
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “ईडीच्या तपासात सचिन वाझे याच्याकडून आलेला पैसा संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्याकडे जायचा. त्यानंतर तो वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत ऋषिकेश देशमुख यांच्या कंपन्या आणि ट्रस्टमध्ये आल्याचं समोर आलंय. त्यामुळे या मनी लाँडरिंगच्या गुन्ह्यात ऋषिकेश देशमुख याचा हात असल्याचं स्पष्ट झालंय. त्याचमुळे त्यांना समन्स बजावण्यात आलं आहे.”