पश्चिम विदर्भ

वाशिम जिल्ह्यात दुसऱ्या डोससाठी ऑनलाईन नोंदणीची आवश्यकता नाही

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसाद

• पात्र व्यक्तींनी दुसरा डोस घेण्याचे आवाहन

वाशिम, दि. ०२  : कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस हा प्रभावी उपाय आहे. त्यामुळे जिल्ह्यात १८ वर्षांवरील जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांकडूनही लसीकरण मोहिमेला प्रतिसाद वाढत असून १ जुलै रोजी जिल्ह्यात एकाच दिवशी ९ हजार ९४३ लोकांचे लसीकरण करण्यात आले.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस २८ दिवसानंतर, तसेच कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस ८४ दिवसांनी दिला जातो. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पुरेशी रोगप्रतिकारकशक्ती तयार होण्यासाठी लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. दुसऱ्या डोससाठी जिल्ह्यात कोव्हॅक्सिन लसीचा पुरेसा साठा उपलब्ध झाला असून जिल्हा सामान्य रुग्णालय, सर्व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांसह इतर लसीकरण केंद्रावर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच या लसीकरण केंद्रांवर १८ वर्षांवरील नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोसही दिला जात आहे. तसेच ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

दुसऱ्या डोससाठी ऑनलाईन नोंदणीची आवश्यकता नाही

 

जिल्ह्यात सध्या १८ वर्षांवरील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत असून पहिल्या डोससाठी येताना १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी ‘कोविन’ अॅपवर नोंदणी करून अपॉईंटमेंट बुक करणे आवश्यक आहे. मात्र ४५ वर्षांवरील नागरिक तसेच दुसरा डोस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी आधारकार्ड घेवून लसीकरण केंद्रावर यावे व लसीचा दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

पात्र व्यक्तींनी दुसरा डोस घेण्याचे आवाहन

सध्या जिल्ह्यात कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतलेले २० हजार पेक्षा अधिक नागरिक दुसऱ्या डोससाठी पात्र आहेत. त्यांच्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, सर्व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस झालेल्या सर्व व्यक्तींनी आपल्या नजीकच्या लसीकरण केंद्रावर जावून लसीचा दुसरा डोस घ्यावा. तसेच ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी कोविशिल्डचा पहिला व दुसरा डोस जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांवर उपलब्ध होणार आहे. तरी दुसऱ्या डोससाठी पात्र नागरिकांनी प्राधान्याने लसीचा दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!