
पारंपारिक शेती ऐवजी आधुनिक पध्दतीची शेती करावी जि.प.अध्यक्षा सरिता गाखरे यांचे शेतकऱ्यांना आवाहन
वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनी पीक स्पर्धेतील विजेत्याचा गौरव
राज्य शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पीक स्पर्धेत विभाग व जिल्हयातील शेतक-यांनी सहभाग नोंदवून हेक्टरी सर्वात जास्त पीकाचे उत्पादन घेऊन नाव लौकिक केला. त्याचप्रकारे शेतक-यांनी पारंपारिक शेतीऐवजी आधुनिक पद्धतीने शेती करुन राज्यात नाव लौकिक करावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे यांनी केले. कृषि दिन कार्यक्रमात पीक स्पर्धेतील विजेत्यांच्या सत्कार प्रसंगी केले त्या बोलत होत्या.
आज वर्धा येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात कृषि दिन कार्यक्रमाप्रसंगी राज्यस्तरीय पीक स्पर्धेत विजेत्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष वैशाली येरावार, श्रीमती मडावी, मृनाल माटे, विजय आगलावे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी प्रज्ञा डायगव्हाणे, कृषी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रवि शेंडे आदी उपस्थित होते.
कोरोना काळात राज्यातील सर्व उद्योग व्यवसाय बंद होते. मात्र या काळातही शेतक-यांनी रात्रंदिवस काबाडकष्ट करुन शेतीचे उत्पन्न चालू ठेवून लोकांच्या अन्नाची भूक भागविली. शेतक-यांच्या शेतमालाला भाव मिळणे आवश्यक आहे. कृषि क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी प्रत्येक ठिकाणी कृषि विद्यापिठाची स्थापना करुन नवयुवकांना कृषि क्षेत्राशी शिक्षणाला जोडून अद्यावत तंत्रज्ञान उपलब्ध करुन दिले. या नविन तंत्रज्ञानाचा उपयोग करुन तरुण – युवा शेतक-यांनी अद्यावत शेतीकडे वळावे असेही श्रीमती गाखरे म्हणाल्यात.
यावेळी मान्यवरांचे हस्ते पीकस्पर्धेत राज्यस्तरावर आदिवासी गटात गहू पिकाचे सर्वात जास्त उत्पादन घेऊन दुसरा क्रमाक प्राप्त केलेले सुधाकर कुंभरे , सर्वसाधारण गटात हरभरा पिकाचे उत्पादन घेऊन दुसरा क्रमांक प्राप्त केलेले सुरेश चेके, तर विभाग स्तरावर सर्वसाधारण गटात गहू उत्पादनात प्रथम कल्पना सोमनाथे, आदिवासी गटात प्रथम राजू चौके, व्दितीय वामन चौके, तृतीय मारोती कुंभरे, व सर्वसाधारण गटात हरभरा पिकासाठी अमोल डबले, व्दितीय मारोती हिंगे व तृतीय विठ्ठल लोखंडे यांचा तसेच जिल्हा स्तरावर सर्वसाधारण व आदिवासी गटात प्रथम , व्दितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या शेतक-यांचा शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.