
बच्चू कडू यांचे स्टिंग ऑपरेशन,आता सखोल चौकशीचे आदेश, अधिकाऱ्यांवर होवू शकते कारवाई
अकोला दि 27 जून: पालकमंत्री बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी वेषांतर करून अकोल्यात स्टिंग ऑपरेशन केले होते,यात अकोला जिल्ह्यातील अनेक पाणपट्ट्यांवर प्रतिबंधित गुटखा मिळत असल्याचे समोर आले होते
याप्रकरणी आता अकोल्यातील अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी होणार आहे आणि दोषी आढल्यास कारवाई केली जाणार आहे,त्यामुळे आता अन्न आणि औषध विभागाच्या कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार असल्याचे पाहायला मिळत आहे.
काही दिवसापूर्वी अकोल्यात बच्चू कडू यांनी अवैधरित्या गुटखाविक्रीचं एक स्टिंग ऑपरेशन केलं. यामध्ये लाचखोरीचं एक धक्कादायक वास्तव उजेडात आलं आहे. बच्चू कडू यांनी वेशांतर करुन तपासणी करत असताना एका दुकानदाराला प्रश्न विचारला की, हा गुटख्याचा माल मी विकू शकतो का? त्यावर दुकानदाराने दिलेलं उत्तर अत्यंत धक्कादायक होतं. दुकानदाराने दिलेल्या उत्तरामुळे राज्यातील लाचखोरीचं वास्तव पुन्हा एकदा सर्वांसमोर आल्याचं पाहायला मिळालं. बच्चू कडू यांचा स्टिंग ऑपरेशनचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
पालकमंत्री बच्चू कडू यांच्या स्टिंग ऑपरेशननंतर अकोला जिल्ह्यात अनेक पाणपट्ट्यांवर प्रतिबंधित गुटखा विकत मिळत असल्याचे समोर आले होते. यावेळी अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी लोकांकडून हफ्ते घेत असल्याचा स्पष्ट आरोप बच्चू कडू यांनी केला होता.
दरम्यान या संदर्भात अकोल्यातील अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी केली जाणार आहे. जर या चौकशीत कोणी दोषी आढळले तर त्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली.