Breaking News

वर्धा जिल्ह्यात 28 जूनपासून दुकाने, आस्थापना सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु राहणार

वर्धा जिल्ह्यात सोमवारपासून नवीन नियमावली

• दुकाने, आस्थापना सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु राहणार

• शनिवारी, रविवारी केवळ अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यास मुभा

• धार्मिक स्थळे, सामाजिक व सांस्कृतिक कार्यकम, सिनेमागृहे बंद

• शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण संस्था राहणार बंद

वर्धा दि. २६  : राज्यात डेल्टा व डेल्टा पल्स व्हेरियंटचे कोरोना विषाणू आढळून आल्याने टप्पा क्र. ३ अंतर्गत निर्बंध लागू करण्याच्या सूचना राज्य शासनाने निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार २८ जून २०२१ रोजीच्या सकाळी ७ वाजेपासून ते १२ जुलै २०२१ रोजीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत जिल्ह्यात नवीन नियमावली लागू होणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमावबंदी व सायंकाळी ५ नंतर संचारबंदी लागू राहील. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी 26 जून रोजी निर्गमित केले आहेत.

या आदेशानुसार अत्यावश्यक वस्तू व सेवांसह इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार दरम्यान सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा राहील. मात्र, शनिवारी व रविवारी केवळ अत्यावशक वस्तू व सेवांची दुकाने सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील व इतर सर्व दुकाने पूर्णतः बंद राहतील. दररोज सायंकाळी ६ ते रात्री ८ या कालावधीत सुद्धा घरपोच दुध वितरण करता येईल. हॉटेल, रेस्टॉरंट, खाणावळी, शिवभोजन थाळी केंद्र सोमवार ते शुक्रवार दरम्यान सायंकाळी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने डाईन इन सुविधेसह सुरु राहतील. तसेच शनिवारी व रविवारी केवळ पार्सल व होम डिलिव्हरी सुविधा सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.

सामाजिक व सांकृतिक कार्यक्रम पूर्णतः बंद राहतील. मॉल्स, चित्रपटगुहे, नाट्यगृहे, सर्व खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस, संगणक प्रशिक्षण केंद्र व टंकलेखन प्रशिक्षण संस्था पूर्णतः बंद राहतील. सर्व प्रकारची धार्मिक व प्रार्थनास्थळे बंद राहतील. परंतु, प्रार्थनास्थळांच्या परिसरामध्ये राहणारे पुजारी व वहिवाटदार यांना पूजा-अर्चना करता येईल. मात्र इतर नागरिकांना प्रवेश राहणार नाही. तसेच ज्या धार्मिक व प्रार्थनास्थळी विवाह व इतर विधी करण्यात येत असतील, तेथे कोविड-१९ नियमांचे पालन करून ५० लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळ्यास मुभा राहील.

जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर दररोज सायंकाळी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील. याठिकाणी ए. सी.चा वापर करण्यास मनाई राहील. सार्वजनिक ठिकाणे, क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, बगीचे, मॉर्निंग वॉक व सायकलिंगला सकाळी ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत मुभा राहणार आहे. बाहेर मोकळ्या जागेत सकाळी ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत व सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत क्रीडा विषयक बाबींना मुभा राहील.

विवाह समारंभामध्ये ५० लोकांच्या उपस्थितीस व अंत्यविधीस २० लोकांच्या उपस्थितीस मुभा राहील. कृषि संबंधित बाबी दररोज सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. ई-कॉमर्स वस्तू सेवा कोविड नियमांचे पालन करून नियमितपणे पूर्णवेळ सुरु राहतील. बांधकाम फक्त इन सिटू किंवा बाहेरून मजूर आणण्याच्या बाबतीत सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु राहील.

खाजगी बँक, विमा, औषधी कंपनी, सूक्ष्म वित्त संस्था व गैर बँकिग वित्तीय संस्था यांची कार्यालये नियमितपणे सुरु राहू शकतील. उर्वरित खासगी कार्यालये, आस्थापना सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. कोरोना विषयक कामे करणाऱ्या आस्थापना, कृषि, बँक, मान्सूनपूर्व कामांशी संबंधित यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित यंत्रणा, कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु राहतील. तसेच दुय्यम निबंधक कार्यालय, एलआयसी, एमएसआरटीसी आदी शासकीय कार्यालये १०० टक्के क्षमतेने सुरु राहतील. उर्वरित सर्व शासकीय कार्यालये ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु राहतील.

सार्वजनिक बस वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरु राहील. मात्र, प्रवाशांना उभ्याने प्रवास करण्यास मनाई राहील. कार्गो वाहतूक सर्व्हीसेस जास्तीत जास्त तीन व्यक्तींसह कोविड विषयक मार्गदर्शक तत्वांचे पालन करून नियमितपणे सुरु राहील. खाजगी कार, टॅक्सी, बस व ट्रेनमधून होणारी आंतर जिल्हा प्रवासी वाहतूक नियमितपणे पूर्णवेळ सुरु राहील. मात्र, प्रवासी लेवल-५ मधील जिल्ह्यातून येत असल्यास ई-पास बंधनकारक राहील.

 

उत्पादन क्षेत्रातील निर्यात प्रधान उद्योग, अत्यावश्यक वस्तू व त्याकरिता लागणारा कच्चा माल उत्पादित, पॅकेजिंग व संपूर्ण साखळी सेवा, निरंतर प्रक्रिया असणारे उद्योग, संरक्षण सबंधित उद्योग, डाटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर, माहिती तंत्रज्ञान सेवा संबंधी, गुंतागुंतीचे पायाभूत सुविधा सेवा व उद्योग कोविड विषयक मार्गदर्शक तत्वांचे पालन करून नियमितपणे पूर्णवेळ सुरु राहतील. याशिवाय उत्पादन क्षेत्रातील इतर उद्योग ५० टक्के मनुष्यबळासह सुरु राहतील. अत्यावश्यक सेवांची यादी शासनाच्या ४ जून २०२१ रोजीच्या आदेशात नमूद आहे.

 

अत्यावश्यक सेवेसह सर्व सेवा देणाऱ्या आस्थापना, प्रतिष्ठाने यांनी कोविड-१९ च्या उपाययोजना जसे, मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर आदीचे काटेकोरपणे पालन करावे. या निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामीण भागात गट विकास अधिकारी तसेच नागरी भागात संबंधित नगरपालिका, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांची राहील. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी इन्सिडेंट कमांडर तथा तहसीलदार यांची राहणार आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ अन्वये तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६० नुसार शिक्षेस पात्र अपराध केला आहे, असे मानण्यात येईल व संबंधितांवर सदर कलमानुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!