
25 जूनला नागपूर मनपा केन्द्रांमध्ये लसीकरण नाही, तीन शासकीय केन्द्र सुरु राहणार
नागपूर, ता.२४ : शासनाकडून नागपूर महानगरपालिकेला कोव्हीशिल्ड लसीचा पर्याप्त पुरवठा उपलब्ध न झाल्यामुळे मनपाच्या सर्व लसीकरण केन्द्रांवर शुक्रवारी (२५ जून) रोजी कोणत्याही वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार नाही, ही माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.
त्यांनी सांगितले की १८ वर्षावरील सर्व वयोगटासाठी कोव्हीशिल्ड लस फक्त तीन शासकीय केन्द्र – डागा रुग्णालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व एम्स मध्ये शुक्रवारी उपलब्ध राहणार आहे. यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.
तसेच ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीन लस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज), बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, सिद्धार्थ नगर, आशिनगर झोन च्या मागे (डॉ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय) व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केन्द्र येथे उपलब्ध आहे.
तसेच ज्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी कोव्हॅक्सीनचा पहिला डोस घेतला आहे त्यांना दुसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज) व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केन्द्र येथे देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी त्यांना ऑनलाईन नोंदणीचा पर्याय उपलब्ध आहे.