पूर्व विदर्भ

भंडारा शहरातील रस्ता चौपदरीकरणासाठी 70 कोटी मंजूर

अपघात कमी व्हावेत यासाठी उपाययोजना करा                                                                                                         -जिल्हाधिकारी संदीप कदम

• रस्ता सुरक्षा आढावा

• सहा महिन्यात 84 अपघात

• 72 व्यक्तींचा अपघाती मृत्यू

भंडारा,दि.24:- भंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने 70 कोटी रुपये मंजूर केले असून या निधीमधून 5.8 किलोमीटर रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. कायम वर्दळ असलेल्या या महामार्गाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आज झालेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत देण्यात आली. रस्त्यावर होणारे अपघात गंभीर विषय असून अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी यंत्रणेला दिल्या. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. एस. फारुकी, उपविभागीय अभियंता अ. द. गणगे, पोलीस उप निरीक्षक महामार्ग अमित पांडेय, उपविभागीय अभियंता महामार्ग संजीव जगताप, आगार व्यवस्थापक फाल्गुन राखडे, नगर अभियंता अतुल पाटील, उपशिक्षणाधिकारी आर. बी. भांबोरे, प्रभारी पोलीस उपअधीक्षक गृह राजेशकुमार थोरात, पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा शिवाजी कदम व राष्ट्रीय महामार्ग राजन पाली यावेळी उपस्थित होते.

भंडारा शहरातील राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूकीची वर्दळ वाढली असून हा रस्ता छोटा असल्याने नेहमी अपघात होतात ही बाब चर्चेला आली असता, या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने 70 कोटी रुपये मंजूर केले असून या निधीमधून 5.8 किलोमीटर रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. हे काम लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे असे जिल्हाधिकारी म्हणाले. भंडारा शहरातून जाणाऱ्या नागपूर-गोंदिया महामार्गावर दुतर्फा असलेले अतिक्रमण काढण्याची कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

मागील सहा महिन्यात म्हणजे जानेवारी ते मे 2021 या कालावधीत 158 रस्ते अपघात झाले असून गेल्या वर्षाच्या तुलनेत हे 27 ने अधिक आहेत. 72 व्यक्तींनी अपघातात आपला जीव गमावला असून मागील वर्षी जानेवारी ते मे 2020 या कालावधीत 55 व्यक्तींनी आपला जीव गमावला होता. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यामध्ये 72 व्यक्तींपैकी अतिवेगामुळे 11, डेंजर ड्रायव्हिंगमुळे 29, दारू प्यायल्यामुळे 01, राँग साईडमुळे 05 व अन्य कारणांमुळे 26 मृत्यु पावले आहेत.

भंडारा-पवनी रस्त्याची उंची जास्त असल्यामुळे महामार्गावरील गावातील जोड रस्त्यांची उंची कमी असल्याने गावकऱ्यांना त्रास होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. अँप्रोच रोडची उंची महामार्ग रस्त्यासोबत लेव्हल करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात असेही त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत अन्य बाबींचा ही आढावा घेण्यात आला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!