नागपूर

नागपूर जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी ४२ हजार नागरिकांचे विक्रमी लसीकरण

*मनपा क्षेत्रात २३ हजार ७०३ग्रामीण भागात १८ हजार १८ लसीकरण* 

तरुणांचा वाढता उत्साह ; ज्येष्ठांचीही उल्लेखनीय उपस्थिती

नागपूर दि. २३ : कोरोना पासून बचावासाठीचा एकमेव रामबाण उपाय म्हणजे प्रतिबंधात्मक लसीकरण. या लसीकरणाला आता जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आजपासून 18 वर्षांवरील लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर एकाच दिवशी नागपूर महानगर व नागपूर ग्रामीण असे एकत्रित मिळून 41 हजार 881 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. हा विक्रमी आकडा आहे.

सुरुवातीला लसीकरणापासून गैरसमजातून अलिप्त राहणाऱ्या नागरिकांनी दुसऱ्या लाटेत आपल्या जवळच्या आप्तस्वकीयांना कोरोना बाधित होऊन मृत्युमुखी पडतांना बघितले आहे. त्यामुळे कोरोना संसर्गात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणजे लसीकरण करणे, हे ग्रामीण भागातही कळून चुकले असून ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने लसीकरणासाठी पुढे येत आहे. विशेषत: आज तरुण मोठ्या संख्येने लसीकरण केंद्रावर पोहोचल्याचे दिसून आले.

आज दिवसभरात नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १८ हजार १८ नागरिकांनी लस घेतली तर महानगरपालिका क्षेत्रामध्ये 22 हजार 221 नागरिकांनी महानगरपालिकेच्या विविध केंद्रावर लस घेतली. तर खाजगी हॉस्पिटलमध्ये 1 हजार 482 अशा एकूण २३ हजार ७०३ नागरिकांनी लस घेतली आहे. जिल्हा व महानगरपालिका आरोग्य यंत्रणेने नागरिक मोठ्या संख्येने लसीकरणात सहभागी होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. जिल्ह्यातील लसीकरण लवकर पूर्ण व्हावे यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्न करीत आहे. लस ही सुरक्षित असून यामुळे शरीरावर दुष्परिणाम होत नाही. याबाबतचे गैरसमज टाळावे व आपल्या जीवित्वाच्या रक्षणासाठी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.

नागरिकांनी मोठ्या संख्येने लसीकरणाला बाहेर यावे.मात्र या काळात कोविड प्रोटोकॉल पाळावा. मास्क बांधणे, शारीरिक दूरी ठेवणे व सॅनिटायझरचा वापर सुरू ठेवणे आवश्यक असल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले आहे.

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाला महाराष्ट्रात सुरूवात झाली होती.परंतु मध्यंतरी लसीकरण थांबविण्यात आले होते. केंद्र शासनाने आता राज्य सरकारला वयोगट ठरविण्याची मुभा दिली आहे. त्यानुसार गेल्या आठवडयात राज्य सरकारने 30 ते 44 गट निश्चित केला होता. आजपासून १८ वर्षावरील लसीकरणाला सुरुवात झाली. नागपूर जिल्ह्यामध्ये ५३ प्राथमिक आरोग्य केंद्र, १० ग्रामीण रुग्णालय व २ उपजिल्हा रुग्णालय आहे. तर मनपा व शासकीय रुग्णालयाच्या एकूण १०६ केंद्रावर शहरात लसीकरण सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!