
मेव्हणीसोबत अनैतिक संबंधातून झाली होती नागपूरात 5 हत्या ,गूढ उलगडलं
नागपूर येथील पाचपावली परिसरातील हत्याकांडाचं गूढ उलगडलं
नागपूर: नागपूरच्या पाचपावली परिसरात एका व्यक्तीने आपल्या पत्नी आणि मुलांसह सासरच्या मंडळींची हत्या करत स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 22 जून उघडकीस आली होती. ही संपूर्ण घटना मेव्हणीसोबतच्या अनैतिक संबंधातून घडली असल्याची नवी माहिती आता समोर आली आहे. ही माहिती पोलीस तपासात समोर येत आहे.
मेव्हणीसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून एकाच वेळी दोन कुटुंबाची राखरांगोळी झाल्याचं आता समोर आलं आहे. आरोपी अलोक मातूरकर याने आपली पत्नी विजया, मुलगा साहिल आणि मुलगी परी, सासुबाई लक्ष्मीबाई आणि मेहुणी – अतिशा यांची आधी हत्या केली आणि नंतर गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. अलोक राहत असलेल्या ठिकाणापासून त्याची सासूरवाडी अगदीच जवळ होती. इथेच आलोकची मेव्हणी अतिशा आणि त्याचे सासू-सासरे राहत होते. दरम्यान, अलोक आणि त्याची मेव्हणी अतिशा यांच्यात अनैतिक संबंध होते. यावरूनच अलोक आणि त्याच्या कुटुंबीयांमध्ये अनेकदा वाद होत होते.
दोन महिन्यापूर्वीच अलोकची मेव्हणी अतिशा हिने अलोकविरुद्ध मारहाणीचा गुन्हा नागपुरातील तहसील पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला होता.जेव्हा अलोकने मेव्हणी अतिशाची हत्या केली तेव्हाच त्याची सासू देखील समोर आली. त्यामुळे अलोकने तिची देखील निर्घृण हत्या केली. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने आपल्या घरी जाऊन आपली दोन मुलं ( 11 आणि 14 वर्ष वय) आणि पत्नीची सुद्धा धारदार शस्त्रानं हत्या केली. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.