
प्राजक्ता वर्मा नागपूरच्या नव्या विभागीय आयुक्त
नागपूर, दि. 22 : मराठी भाषा विभागाच्या सचिव श्रीमती प्राजक्ता वर्मा यांची नागपूरच्या विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीमती वर्मा या भारतीय प्रशासन सेवेतील 2001 च्या तुकडीच्या सनदी अधिकारी असून त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे प्रांताधिकारी पदापासून त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात केली.
सध्या त्या मराठी भाषा विभागामध्ये सचिव पदावर कार्यरत असून, त्यांनी यापूर्वी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, धुळे जिल्हाधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालक, सह विक्रीकर आयुक्त, मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त, सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालक अशा विविध पदांवर काम केले आहे.
सिडको येथे सह व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत असताना त्यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी दहा गावांचे गावठाणासहित पुनर्वसन करण्याची जबाबदारी पार पाडली. त्या धुळे जिल्हाधिकारी होत्या. तसेच अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असताना संत गाडगेबाबा अभियान, हागणदरीमुक्त अभियानात 163 गावांना लोकसहभागातून केंद्र शासनाच्या निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे प्रांताधिकारी म्हणून शासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर महात्मा फुले जलसंधारण अभियानात लोकसहभागातून वैजापूर पंचायत समितीला प्रथम क्रमांकाचे (17 लाख रुपयांचे) बक्षीस मिळाले. श्रीमती वर्मा यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक म्हणून जून 2009 ते मे 2011 दरम्यान काम पाहिले असून या विभागाला अधिक तंत्रस्नेही बनविण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले.