
नागपूरात आजपासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण
प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात सुविधा
नागपूर दि १८ जून : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी राज्य सरकारने उद्यापासून ते 30 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. उद्या दिनांक 19 जून पासून जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लसीकरणाला सुरुवात होणार आहे.
रात्री उशिरा या संदर्भातील राज्य शासनाचे निर्णय जाहीर झाले असून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने या उपक्रमासाठी सज्ज व्हावे, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले आहेत. प्रत्येक केंद्रावर एक हजार लसीकरणाचे उद्दिष्ट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले असून तिसरी लाट थोपविण्यासाठी लसीकरणाची गती वाढविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यापूर्वी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाला महाराष्ट्रात सुरूवात झाली होती.परंतु मध्यंतरी लसीकरण थांबविण्यात आले होते. केंद्र शासनाने आता राज्य सरकारला वयोगट ठरविण्याची मुभा दिली आहे. त्यानुसार राज्य सरकारने 30 ते 44 गट निश्चित केला असून उद्यापासून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये ५३ प्राथमिक आरोग्य केंद्र, १० ग्रामीण रुग्णालय व २ उपजिल्हा रुग्णालय आहे. या सर्व ठिकाणी उद्यापासून लसीकरणाला सुरुवात होणार आहे.