
सोमवार-मंगळवारला लसीकरणाची विशेष मोहीम राबवा – जिल्हाधिकारी संदीप कदम
• 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण
• एकच मिशन लसीकरण
भंडारा,दि.16:- कोविड लसीकरणात ज्या गावांचा प्रतिसाद कमी आहे किंवा अत्यल्प आहे अशा गावातील 45 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी येत्या सोमवारी व मंगळवारी म्हणजे 21 व 22 जून रोजी जिल्ह्यात लसीकरणाची विशेष मोहीम आयोजित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी सर्व यंत्रणांना दिले. नागरिकांनी लस घ्यावी यासाठी शुक्रवार ते रविवार दरम्यान सर्व अधिकाऱ्यांनी विशेष जागृती अभियान राबविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून कोविड 19 व लसीकरण अभियानाचा आढावा घेतला असता त्यांनी उपरोक्त निर्देश दिले. उपजिल्हाधिकारी महेश पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास, डॉ. माधुरी माथूरकर यावेळी उपस्थित होते. तर सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, खंड विकास अधिकारी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
लसीकरण कमी असलेल्या गावांची तालुकानिहाय संख्या खालीलप्रमाणे आहे. भंडारा 53, मोहाडी 26, साकोली 48, लाखनी 25, पवनी 39, लाखांदूर 34 व तुमसर 19 अशा एकूण 244 गावांमध्ये दोन दिवस विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. सोमवारी 130 गावात तर मंगळवारी 114 गावांमध्ये 45 वर्षावरील नागरीकांना लस देण्याचा हा कार्यक्रम आहे.
कोरोनावर लस हाच एकमेव इलाज असून नागरिकांनी लस घ्यावी यासाठी तालुकास्तरीय अधिकारी, शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी लसीकरण कमी असलेल्या गावात घरोघरी भेटी देऊन लोकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. यासाठी गावचे सरपंच व स्थानिक लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेण्यात यावे. गृहभेटीत गावकऱ्यांना लस घेणे आरोग्यासाठी कसे महत्वाचे आहे हे पटवून देण्यात यावे असे त्यांनी सांगितले.
पुढील पाच ते सहा दिवस लसीकरण या विषयावर लक्ष केंद्रित करून ज्या गावात लसीकरणाची टक्केवारी कमी आहे ती वाढविण्यावर भर देण्यात यावा. सर्व यंत्रणांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे. ज्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधित क्षेत्र आहे त्या ठिकाणी नियमित भेटी देण्यात याव्यात. सोमवारी व मंगळवारी आयोजित लसीकरण केंद्राला उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी भेटी देऊन लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. या बैठकीत कोरोना विषयक बाबींचा आढावा घेण्यात आला.