Breaking News

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वर्धेच्या सरपंचांशी संवाद 

*सरपंचांनी राबवलेल्या अभिनव संकल्पनांचे केले कौतुक*

 *वर्धा जिल्ह्याच्या रसुलाबाद येथील सरपंचांना मिळाली मुख्यमंत्र्यांशी संवाद करण्याची संधी* 

*गावातील प्रत्येकाची आरोग्य तपासणी केल्याने गाव कोरोनामुक्त करण्यात मिळाले यश*

गावातील प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी, तरुण मुलामुलींचे आरोग्य सेवक पथक, गावातील निर्जंतुकीकरण आणि गावातीलच पण मोठया शहरांमध्ये सेवा देणा-या दोन तरुण डॉक्टर मुलांच्या मार्गदर्शन आणि सहकार्याने रसुलाबाद गाव आज कोरोनामुक्त करण्यात यश मिळाले अशी महिती रसुलाबादचे सरपंच राजेश सावरकर यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना दिली.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर,अमरावती आणि औरंगाबाद महसूल विभागातील सरपंचांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रत्येक जिल्ह्यातील एका सरपंचांकडून त्यांनी त्यांच्या गावात कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी केलेल्या उपाय योजनांची माहिती जाणून घेतली.

यावेळी सरपंच राजेश सावरकर यांनी रसुलाबादची लोकसंख्या 3781 असून 1035 कुटुंब आहेत असे सांगून यांनी पहिल्या लाटेत कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समजताच गावाने सर्वानुमते बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी गावबंदीचा निर्णय घेतला. पण त्याचबरोबर गावातील प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी करून घेतली. गावात तरुण मुलामुलींचे 50- 50 व्यक्तींचे दोन गट स्थापन करून त्यांना गावातील प्रत्येकाच्या घरी कोण आजारी आहे याची विचारपूस करण्याची जबाबदारी सोपवली.

रसुलाबाद येथील दोन डॉक्टर मुलांचे मार्गदर्शन खूप महत्वाचे ठरल्याचे यावेळी सावरकर यांनी सांगितले. गावातील आशा , अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, पोलीस पाटील आणि शिक्षकांनी त्यांची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली. गावात दुसऱ्या लाटेत 35 रुग्ण होते. त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला. आज गावात कुणीही कोरोना रुग्ण नाही असेही त्यांनी सांगितले.

कोरोना लसीकरणाबाबत गावातील लोकांमध्ये असलेले गैरसमज दूर करून गावात 75 टक्के लसीकरण करून घेतले. त्याचबरोबर कोरोना काळात रक्तदान आणि प्लाझ्मादान करण्यासाठी सुद्धा लोकाना प्रोत्साहित केले असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आभार मानले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी सरपंचाना मार्गदर्शन करताना म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्व सरपंचांचा मला अभिमान असून त्यांनी मुख्यमंत्र्यांना आपलेपणाने नेहमीच सहकार्य केले आहे. सर्व सरपंचांनी कोरोना कालावधीत उत्तम काम केले असून त्यांनी राबविलेल्या अभिनव संकल्पनासाठी त्यांचे अभिनंदन केले. मात्र यापुढेही गावात कोरोनाला प्रवेश द्यायचा की नाही ते आपणच ठरवायचे आहे. आता कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे असे समजून आपण गाफील राहू नये. कोरोना हा बेसावध असतानाच गाठतो. त्यामुळे रुग्णसंख्या थोडीही वाढली तरी लगेच उपाययोजना सुरू करा. गावातील प्रत्येक वस्तीमध्ये टीम करून त्यांना घरे वाटून प्रत्येकाची विचारपूस करायला सांगा. चाचण्यांची संख्या कमी करू नका. पावसाळा सुरू झाल्यामुळे साथीचे आजार वाढतील त्यामुळे त्याकडेही लक्ष द्या.

लसी उपलब्ध होतील तसा लसीकरणाचा वेग वाढेल. पण लस घेतळ्यामुळे कोरोना होणार नाही असे समजू नका. पण लस घेतल्यामुळे कोरोना तुमच्यासाठी घातक ठरणार नाही. मास्क हीच आपली या शत्रूशी लढण्यासाठीची ढाल आहे. त्यामुळे मास्क, हाताची स्वच्छता आणि शारीरिक अंतर या त्रिसूत्रीचा कायम अवलंब करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि औरंगाबाद येथून महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनीही मार्गदर्शन केले.

यावेळी वर्धा जिल्ह्यातून जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओंबासे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, आर्वी तालुक्यातील रसुलाबादचे सरपंच राजेश सावरकर आणि सेलू तालुक्यातील कोटंबा गावच्या सरपंच रेणुका कोटंबकर सहभागी झाल्या होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!