
मान्सून काळातील आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज रहा – पालकमंत्री शंभूराज देसाई
• मान्सूनपूर्व तयारी, कोरोना सद्यस्थितीचा आढावा
• कोरोना लसीकरण मोहीम अधिक गतिमान करण्याच्या सूचना
वाशिम, दि. ०९ : आगामी मान्सून काळात जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास, त्याचे निवारण करण्यासाठी शासकीय यंत्रणांनी सज्ज रहावे. या काळात सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. तसेच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्यात आवश्यक आरोग्य सुविधा सज्ज ठेवण्यावर भर द्यावा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. मान्सूनपूर्व तयारी व जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज, ९ जून रोजी दुरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कळमकर, महावितरणचे कार्यकारी अभियंता तायडे, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी विकास बंडगर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री देसाई यांनी यावेळी मान्सूनपूर्व तयारी, जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची सद्यस्थिती, कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम, लहान मुलांसाठी तयार करण्यात येत असलेल्या स्वतंत्र वार्डची सद्यस्थिती आदी बाबींचा आढावा घेतला.
पालकमंत्री देसाई म्हणाले, मान्सून काळात ग्रामीण भागातील काही रस्त्यांवरील पूल पाण्याखाली जावून वाहतुकीला अडथळा निर्माण होवू शकतो. या परिस्थितीतही नागरिक पूल ओलांडण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते, त्यामुळे या अनुषंगाने विशेष खबरदारी घ्यावी व अशा मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवावी. धोकादायक इमारतींमुळे जीवितहानी होवू नये, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास महावितरणने त्वरित कार्यवाही करून सदर वीज पुरवठा पूर्ववत करावा. तलाव, बंधाऱ्यातील पाणी शेतीमध्ये जावून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
सद्यस्थितीत जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्ग कमी होत असून ही अतिशय दिलासादायक बाब आहे. मात्र, तरीही संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी सज्ज होणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेवर भर देवून ४५ वर्षांवरील व्यक्तींचे जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत. लोकांच्या मनात काही गैरसमज असल्यास ते दूर करण्यासाठी गावपातळीवर जनजागृती मोहीम हाती घ्यावी. तलाठी, ग्रामसेवक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने घरोघरी जावून लोकांना लसीकरणाचे महत्व पटवून द्यावे, अशा सूचना पालकमंत्री देसाई यांनी केल्या. तसेच वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालय, कारंजा उपजिल्हा रूग्णालयासह सर्व ग्रामीण रुग्णालय स्तरावर कोरोना बाधित लहान मुलांसाठी स्वतंत्र वार्ड सुरु करण्यासाठी नियोजन करावे, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी जिल्हा प्रशासनाने केलेली मान्सूनपूर्व तयारी व कोरोना सद्यस्थितीविषयी माहिती दिली. ते म्हणाले, पूर परीस्थिती निर्माण झाल्यास जिल्ह्यातील ५ गावांना पाण्याचा वेढा पडण्याची शक्यता आहे. या गावांमध्ये तीन महिन्यासाठी लागणारे अन्नधान्य व पुरेसा औषध साठा उपलब्ध ठेवण्यात येईल. तसेच पुरामध्ये अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी बचाव पथके तयार करण्यात आली आहेत. मान्सून कालावधीत पुरेशा प्रमाणात आरोग्य सुविधा, शुध्द पाणी पुरवठा याविषयी उपाययोजना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना सद्यस्थितीची माहिती देताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या दहा दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना संसर्ग कमी होत आहे. दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या शंभरहून कमी आहे. तसेच ऑक्सिजन बेडवर असणाऱ्या रुग्णांची संख्या सुद्धा शंभरहून कमी झाली आहे. सध्या जिल्ह्यात ४५ वर्षांवरील सुमारे ४४ टक्के व्यक्तींचे लसीकरण पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पंत, पोलीस अधीक्षक परदेशी यांनी कोरोना संसर्ग प्रतिबंधाविषयी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.