
वर्धेच्या नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने लसीकरण करुन घ्यावे – जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार
*स्वयंसेवी संस्थेमार्फत सुरु करण्यात आलेल्या पहिल्या लसीकरण केंद्राचे जिल्हाधिका-यांचे हस्ते लोकार्पण*
मागील वर्षीपेक्षा यावर्षी जिल्ह्यात कोविड 19 विषाणूचा संसर्ग मोठया प्रमाणात झाला. अशा परिस्थितीत नागरिक व स्वयंसेवी संस्थानी कोरोना चाचणीसाठी केलेल्या सहकार्यामुळे जिल्हयाचा पॉझिटिव्ह दर कमी करण्यास मदत झाली आहे. नागरिकांना लसीकरणासाठी सुद्धा प्रवृत्त करण्यासाठी स्वयंसेवी संस्थानी असेच सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले .
अनेकांत स्वाध्याय मंदिर व रोटरी क्लबच्या वतीने अनेकांत स्वाध्याय मंदिर येथे सुरु करण्यात आलेल्या लसीकरण केद्राच्या लोकार्पण प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, वर्धा नगर परिषदेचे अध्यक्ष अतुल तराळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, मुख्याधिकारी विपीन पालीवाल, तहसिलदार रमेश कोळपे , तालुका आरोग्य अधिकारी श्रीमती दिगिकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष अमित गांधी आदी उपस्थित होते.
स्वयंसेवी संस्थेमार्फत सुरु करण्यात आलेले जिल्हयातील हे पहिले लसीकरण केद्र असून या लसीकरण केंद्राव्दारे शहरातील नागरिकांना लसीकरणाचा लाभ मिळेल. लसीकरणाच्या पहिल्या टप्यात जिल्हयाने चांगला उच्चाक गाठला असून 44 वर्षावरील नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. सध्याचा लसीकरणाचा वेग 10 पटीने वाढविल्यास जिल्हयाचे 70 लसीकरण लवकर पूर्ण होईल. यामुळे तिसऱ्या लाटेचा जास्त परिणाम जिल्ह्यात होणार नाही असे प्रेरणा देशभ्रतार म्हणाल्या. येत्या दोन आठवडयात जास्तीत जास्त लसीकरण करण्यास नागरिकांनी सहकार्य करावे असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाला रोटरी क्लबचे सचिव गजानन पडोळे, प्रकल्प संचालक आसिफ भाई, प्रकल्प मार्गदर्शक महेश मोकलकर, राजेश नरहरशेट्टीवार, नितीन शिंदे, डॉ. पाटणी, महाविर पाटणी, रवि पडोळे यांची उपस्थिती होती.