नागपूर

हॉटेल, रेस्टॉरंट, मॅरेज हॉल, लॉंन, फॉर्म हाऊस,रिसॉर्ट कोरोना वाढीस कारणीभूत ठरू नये: पालकमंत्री

* हॉटेल, रेस्टॉरंट व्यापारी व उद्योजक जगतातील मान्यवरांची पालकमंत्री सोबत संवाद*

* कोरोना संपला नाही ;सर्व कर्मचाऱ्यांचे आधी लसीकरण करा*

* जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांनी बैठकी घेऊन सूचना देण्याचे निर्देश*

* काळजी न घेणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना*

 

नागपूर दि. 7:- हॉटेल, रेस्टॉरंट, मंगलकार्यालये, लॉंन, फॉर्म हाऊस, रिसॉर्ट कोरोना वाढीचे हॉटस्पॉट ठरू नयेत. त्यामुळे या सर्व आस्थापनातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करूनच व्यवसायाला सुरुवात करा. याठिकाणी कोरोना प्रोटोकॉलचे पालन झालेच पाहिजे, अशा पद्धतीचे सक्त वातावरण ठेवा, अशा सूचना ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांसोबत आज हॉटेल रेस्टॉरंट असोसिएशन, नागपूर व उद्योग, व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी या दोन्ही संघटनांनी विविध मागण्या पालकमंत्र्यांकडे मांडल्या. पालकमंत्र्यांनी सध्या अतिशय नाइलाजाने अनेक गोष्टींमध्ये सूट द्यावी लागत आहे. कोरोनाची तिसरी लाट येणार नाही याची काळजी घ्या. शुक्रवारला या परिस्थितीचा पुन्हा आढावा घेऊन जनतेला काही सुविधा बहाल करण्यात येईल असे स्पष्ट केले.

या बैठकीला जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी व अन्य अधिकारी उपस्थित होते. दुसऱ्या लाटेत आमच्या आजूबाजूच्या अनेक जणांच्या घरातले जिवलग गेले आहेत. हे आम्हाला विसरता कामा नये. कोरोनाला गृहीत धरू नका. अत्यंत नाईलाजाने अनेक ठिकाणी शिथिलता आणावी लागत आहे. मात्र जनतेने सावध असावे, समाजातील सर्व घटकांनी या बाबीचा विचार करून पाच वाजेपर्यंतच्या नियमाचे पालन करावे असे आवाहन केले.

शासनाने आदेश दिले आहेत या आदेशात नमूद केल्याप्रमाणेच व्यक्तींची संख्या असावी. सामाजिक अंतराचे तंतोतंत पालन करण्यात यावे, ग्राहक तसेच इतर सर्व व्यक्तींनी मास्कचा वापर करणे अनिवार्य ठेवावे, परिसर वेळोवेळी सॅनीटाईज करावा व स्वच्छ स्वच्छता ठेवण्यात यावी. कोविड आजाराचे लक्षणे असणारे कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्यात येऊ नये. प्रत्येकाची चाचणी करावी. आजाराची लक्षणे असणाऱ्या ग्राहकांना देखील प्रवेश देऊ नये, अशा सूचना केल्या. यासोबतच या सर्व व्यापाऱ्यांनी व आस्थापना प्रमुखांनी आपल्या अधिनस्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घ्यावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

याशिवाय प्रत्येकाने दर्शनी भागामध्ये कोरोना प्रोटॉकल संदर्भातील फ्लेक्स लावणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर जिल्ह्यात यापूर्वी झालेले लग्नसोहळे व मोठे कार्यक्रम कोरोना वाढविण्यास कारणीभूत ठरल्याचा एक मतप्रवाह आहे. त्यामुळे ही बाब दुर्लक्षित होणार नाही याकडे लक्ष देण्याचे त्यांनी सांगितले.

नागपूर शहरांमध्ये यासंदर्भात महानगरपालिकेने नियंत्रण ठेवावे. यासाठी गरज पडल्यास झोननिहाय बैठकी घेण्यात याव्यात. प्रत्येक आस्थापना सोबत महानगरपालिकेचा संपर्क झाला पाहिजे, असे त्यांनी निर्देशीत केले.

तर ग्रामीण भागामध्ये उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार व त्यांच्या कार्यक्षेत्रातील उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलीस निरीक्षक, खंडविकास अधिकारी, मुख्याधिकारी, सर्व हॉटेल व मंगल कार्यालयाच्या मालकांचा समावेश असावा. शासनाच्या निर्देशांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!