
कोरोना संसर्गात घट, पण खबरदारी घेणे आवश्यक – पालकमंत्री शंभूराज देसाई
• जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थितीचा आढावा
• गर्दीवर नियंत्रण ठेवून कोरोना चाचण्यांवर भर देण्याच्या सूचना
• संस्थात्मक विलगीकरण कक्षांमध्ये मुलभूत सुविधा उपलब्ध करा
वाशिम, दि. 02 : जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने १ जूनपासून जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. संसर्ग कमी झाला असला तरी गाफील राहून चालणार नाही. कोरोना सुरक्षा नियमांचे पालन करणे, मास्कचा वापर करणे, गर्दी टाळणे यासारख्या उपाययोजनांवर यापुढेही भर देवून कोरोना चाचण्यांची संख्या कमी न होवू देता, त्या कायम ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थिती व खरीप हंगामाच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी आज, १ जून रोजी दुरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा सभेत ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री देसाई म्हणाले, गेल्या सात दिवसांमध्ये जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले असून जिल्ह्याच्या दृष्टीने ही दिलासादायक बाब आहे. त्यामुळे जिल्ह्यात निर्बंध शिथिल करून सर्व दुकाने सुरु करण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. तसेच रुग्ण संख्येत घट झाली असली तरी कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात बाधितांच्या संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्यात आला आहे. गावपातळीवर स्थापन करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षामध्ये वीज, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यासारख्या मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये रुग्णांची गैरसोय होवू नये, यासाठी विशेष खबरदारी घ्यावी. याविषयी संनियंत्रण करण्यासाठी तालुकास्तरावर स्वतंत्र नोडल अधिकारी नेमावेत, असे पालकमंत्री श्री. देसाई यावेळी म्हणाले. तसेच जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे पालक गमाविलेल्या अनाथ बालकांची माहिती संकलित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
खरीप हंगामाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे, खते यांची टंचाई भासणार नाही, याची दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांना बांधावर खते, बियाणे उपलब्ध करून देण्याची मोहीम अधिक गतिमान करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या मोहिमेतून थेट बांधावर खते, बियाणे देण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिल्या. तसेच जिल्ह्यातील पीक कर्ज वितरणाचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला.
जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी जिल्याच्तील कोरोनाविषयक सद्यस्थितीची माहिती दिली. ते म्हणाले, गेल्या सात दिवसांमध्ये जिल्ह्याचा ‘पॉझिटिव्हीटी रेट’ १२ वरून ४ ते ५ पर्यंत खाली आला आहे. तसेच दैनंदिन रुग्ण संख्या १०० ते १५० च्या दरम्यान असून जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या २ हजारच्या आतमध्ये आली आहे. जिल्ह्यात सध्या बाधितांच्या संस्थात्मक विलगीकरणावर भर दिला जात असून सध्या जवळपास ७८ टक्के रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यात गतवर्षी खरीप हंगामात सुमारे २३ हजार शेतकऱ्यांना २०९ कोटी पीक कर्ज वितरीत करण्यात आले होते, यंदा आतापर्यंत ६४ हजार ४९ शेतकऱ्यांना ५१७ कोटी ५१ लक्ष पीक कर्जाचे वितरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पंत म्हणाल्या, ज्या ठिकाणी मुलभूत सुविधा आहेत, अशा ठिकाणी गावपातळीवर संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आले आहेत. तसेच संबंधित तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी यांना याकरिता नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले असून तक्रारी निवारणाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक परदेशी यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी तोटावार म्हणाले, जिल्ह्यात बियाणे व खतांची पुरेशा प्रमाणात उपलब्धता आहे. सोयाबीनचे घरगुती बियाणे वापरणाऱ्या शेतकऱ्यांना कृषि विभागामार्फत बीजप्रक्रिया प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच ट्रॅक्टरचालकांना सुद्धा पेरणीविषयी प्रशिक्षण देण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.