पश्चिम विदर्भ

वाशीममध्ये कोरोना विषयक आणि लसीकरण आढावा बैठक

कोरोना चाचणीत सातत्य ठेवून लसीकरण वेळेत पूर्ण करा – विभागीय आयुक्त पीयूष सिंह

वाशिम, दि. २९  : कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस कमी होतांना दिसत असला तरी कोरोना विषयी मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. बाधितांच्या संपर्कातील व्यक्ती आणि कोरोना लक्षणे असणाऱ्या व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात सातत्य कायम ठेवून पात्र व्यक्तींचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आज, २८ मे रोजी झालेल्या कोरोनाविषयक आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधिक्षक वसंत परदेशी, सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील विंचनकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गोल्हे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

सिंह म्हणाले, नव्याने कोरोनाबाधित आढळलेल्या व्यक्तींचे योग्य प्रकारे संस्थात्मक विलगीकरण करण्यात यावे. ज्या ठिकाणी विलगीकरण करण्यात येणार आहे, त्या विलगीकरण केंद्रात पुरेशा सुविधा उपलब्ध असाव्यात. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. बाजारपेठेत गर्दी होणार नाही, याची दक्षता घेवून सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्ती हा तोंडाला मास्क लावून असला पाहिजे. कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. ‘माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आपआपल्या जबाबदारीची जाणीव करुन दयावी, असे यावेळी ते म्हणाले.

कोरोना बाधित रुग्णाला ऑक्सीजनची आवश्यकता लक्षात घेवून जिल्ह्यात ज्या ठिकाणी प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्यात आले आहे, त्यांची देखभाल करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची नियुक्ती करावी, असे सांगून श्री. सिंह म्हणाले, भविष्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर काही कोरोना रुग्णांना प्राणवायूची आवश्यकता भासणार नाही. तेंव्हा कोविड नसलेल्या इतर रुग्णांना त्या प्राणवायूचा चांगल्या प्रकारे उपयोग होवून त्यांचे प्राण वाचविण्यास मदत होणार आहे. रुग्णालयाच्या इमारतीचे फायर व स्ट्रक्लचर ऑडीट त्वरीत करावे. जिल्ह्यात आढळून येणाऱ्या म्युकरमायकोसिस रुग्णांवर वेळीच उपचार करण्यात यावे. तिसऱ्या लाटेचा धोका बालकांना असल्याने जिल्ह्यात बालकांवर उपचाराच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण करावी, असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी षण्मुगराजनएस. म्हणाले, जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होणार नाही, यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध आस्थापना चालकांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. बाधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्ती तसेच कोरोनाची लक्षणे दिसून आलेल्या व्यक्तींची चाचणी करण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग कमी होत असला तरी जास्तीत जास्त चाचण्या करण्यात सातत्य ठेवण्यात आले आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्याचा मागील सात दिवसाचा कोरोना पॉझिटिव्हीटी रेट सरासरी ६.९६ टक्के असल्याचे सांगून षण्मुगराजन एस. म्हणाले, आतापर्यंत २ लाख २४ हजार ५४ व्यक्तींना लसीची मात्रा देण्यात आल्या. यामध्ये १ लाख ४८ हजार ६३३ कोविशिल्ड आणि ७५ हजार २२२ कोव्हॅक्सीनच्या लसीचा समावेश आहे. जिल्ह्यात पाच ठिकाणी प्राणवायू निर्मिती प्रकल्पाचे ठिकाण निश्चित केले असून त्यापैकी शासकीय स्त्री रुग्णालय येथील ०.३७ मेट्रीक टन क्षमतेचा प्रकल्प कार्यान्वीत झाला असून उर्वरीत चार प्रकल्प मे महिण्याच्या अखेरीस आणि पुढील महिन्यात कार्यान्वीत होतील. या सर्व प्रकल्पाची एकूण प्राणवायू निर्मिती क्षमता ४.८५ मेट्रीक टन असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागात देखील कोरोना चाचण्या नियमीतपणे करण्यात येत असल्याचे सांगून पंत म्हणाल्या, ज्या बाधित रुग्णांना कोणतेही लक्षणे दिसून आले नाही, त्यांना गावातच संस्थात्मक विलगीकरण केंद्रात तर सौम्य लक्षणे दिसून आलेल्या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करुन औषधोपचार करण्यात येत असल्याचे सांगितले.

डॉ. राठोड यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता बालकांची काळजी व उपचार करण्याच्या दृष्टीने नुकतीच बालरोग तज्ञांची सभा घेण्यात आली असून जिल्ह्यात बाल रुग्णांसाठी उपचाराच्या दृष्टीने ११ डॉक्टरांनी २७५ बेडची व्यवस्था केली असल्याचे सांगितले.

डॉ. आहेर यांनी जिल्ह्यात ८३ हॉटस्पॉट क्षेत्र असल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम, कोरोना चाचणी विषयी माहिती दिली.

यावेळी विभागीय आयुक्त सिंह यांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीककर्ज विषयक अडचणी, ग्रामीण भागता लॉकडाऊन बाबतची माहिती, अन्नधान्य वितरण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना धान्याचे वितरण, रोहयोची कामे व शिवभोजन योजनेविषयी माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!