पश्चिम विदर्भ

दिलासादायक : वाशिम जिल्ह्याच्या कोरोना ‘पॉझिटिव्हीटी रेट’मध्ये घट

  1. गेल्या पाच दिवसांत एक अंकी ‘पॉझिटिव्हीटी रेट’

प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची फलनिष्पत्ती

वाशिम: जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे गेल्या काही दिवसांत कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण आटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाचे सामुहिक प्रयत्न व त्याला नागरिकांचे सहकार्य मिळाल्याने जिल्ह्याचा ‘पॉझिटिव्हीटी रेट’ घटला असून गेल्या पाच दिवसांपासून हे प्रमाण एक अंकी संख्येत आहे. ‘पॉझिटिव्हीटी रेट’मध्ये झालेली घट जिल्ह्यासाठी काही प्रमाणात दिलासादायक आहे. मात्र, तरीही कोरोना विषाणू संसर्ग पुन्हा वाढू नये, यासाठी नागरिकांनी कोरोना सुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

कोरोना विषाणू संसार्गात वाढ झाल्याने जिल्ह्यात विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या. यामध्ये कोरोना चाचण्यांची संख्या वाढविणे, कोरोना बाधिताच्या संपर्कातील जास्तीत जास्त व्यक्तींचा शोध घेवून त्यांची कोरोना चाचणी करणे यासह कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम गतिमान करण्यात आली. जिल्ह्यात रोज सुमारे ३५०० ते ४००० कोरोना चाचण्या करून अधिकाधिक कोरोना बाधितांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिह्यात ९ मे पासून जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले. या निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी फिल्डवर जावून तसेच आढावा बैठकांच्या माध्यमातून सातत्याने उपाययोजनांचा आढावा घेतला.

जिल्हा प्रशासनातील सर्वच यंत्रणांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले. आरोग्य विभागाने कोरोना बाधित रुग्ण आढळलेल्या गावांमध्ये विशेष कॅम्प घेवून कोरोना चाचण्या केल्या. तसेच लसीकरण मोहीम अधिक प्रभावी होण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र स्तरावर जनजागृती करून लसीकरणाला वेग दिला. जिल्हा प्रशासनातील सर्व घटकांनी केलेल्या सामुहिक प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाचा आलेख कमी होताना दिसून येत आहे.

गेल्या १५ दिवसांमध्ये जिल्ह्याचा ‘पॉझिटिव्हीटी रेट’ टप्प्या-टप्प्याने कमी झाला आहे. गेल्या पाच दिवसांत म्हणजेच २१ मे रोजी ८, २२ मे रोजी ७.०८, २३ मे रोजी ६.३५, २४ मे रोजी ७.३५ आणि २५ मे रोजी ७.१४ इतके ‘पॉझिटिव्हीटी रेट’ नोंदविला गेला. सुमारे ४० दिवसानंतर ‘पॉझिटिव्हीटी रेट’ एक अंकी झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. तसेच ‘पॉझिटिव्हीटी रेट’ कमी होणे ही जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासादायक बाब असली तरी भविष्यात कोरोना विषाणू संसर्ग आणखी वाढू नये, यासाठी नागरिकांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टंन्सिगच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी संस्थात्मक विलगीकरणावर भर

जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण कमी होत असले तरी भविष्यात संसार्गात वाढ होवू नये, यासाठी जिल्हा प्रशासन खबरदारीच्या उपाययोजना करीत आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील कोरोना बाधितांचे संस्थात्मक विलगीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी लक्षणे नसलेल्या बाधितांसाठी गावामध्येच विलगीकरण कक्ष स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून काही गावांमध्ये प्रत्यक्ष विलगीकरण कक्ष सुरु झाले आहेत. तसेच सौम्य लक्षणे असलेल्या बाधितांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर विलगीकरण कक्ष सुरु करण्याचे नियोजन सुरु आहे. संस्थात्मक विलगीकरण केल्यामुळे बधीतांपासून इतरांना संसर्ग होणार नाही, परिणामी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण आणखी कमी होण्यास मदत होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!