पूर्व विदर्भ

सोशल मीडियावार वैयक्तीक माहिती शेअर करु नका:जिल्हा पोलीस अधिक्षक जाधव 

समाज माध्यमांचा वापर काळजीपूर्वक करा

खात्री केल्याशिवाय पोस्ट करु नका

आपला ओटीपी कुणालाही देऊ नका

बँक डिटेल शेअर करु नका

भंडारा,दि.25:- जगभरात घडणाऱ्या घडामोडी तात्काळ लोकांपर्यत पोहोचण्यासाठी समाज माध्यमांचा वापर होत असला तरी सोशल मिडीयाच्या माध्यमातून फसवणूकीचेही प्रकार मोठ्या प्रमाणात घडतांना दिसत आहेत. फेसबुक, व्हॉट्सॲप व व्टिटर सारख्या संकेत स्थळावरुन अनावश्यक व वैयक्तीक टिका टिप्पणी, कॉमेंट, फोटोक्रॉप करुन बदनामी करणे व अवमानना करण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होत आहेत. सायबर कायद्यानुसार हा गुन्हा असून सोशल मिडीया वापरतांना वापरकर्त्यांनी सावधानता बाळगावी तसेच हॅकर, फसवणूक करणारे असामाजिक तत्वापासून सावध रहावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत जाधव यांनी केले आहे.

• सध्यास्थितीत विविध बँकांनी त्यांचे ग्राहकांना त्यांचे कर्ज खात्यांचे संबंधित इ.एम.आय. पुढे ढकलण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी सायबर गुन्हेगार बँक अधिकारी बोलत असल्याचे भासवुन त्यांचे बँक खात्याचे संबंधित गोपनीय माहिती (पिन, सी.व्ही.व्ही., ओ.टी.पी.) प्राप्त करुन घेऊन फसवणूक करीत आहेत. याबाबत सतर्कता आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

• सायबर गुन्हेगार ग्राहकांना बँकांच्या नावे एस.एम.एस. पाठवून त्याव्दारे (ऐनी डेस्क, क्विक सपोर्ट, टिम व्यूअर, एअर डॉईड) इत्यादी सारखे वेगवेगळे स्क्रिन शेअरिंग ॲप्स डाऊनलोड करण्यास भाग पाडतात व त्यांचा मोबाईल व संगणकाचा अनधिकृतपणे ताबा घेऊन फसवणूक करीत आहेत. कुठल्याही नवख्या व्यक्तीला वैयक्तीक माहिती पूरवू नका, असे ते म्हणाले.

• आपणास एखाद्या अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन व्हॉट्सअप व्हिडीओ कॉल करुन आपल्या चेहऱ्याचे फोटो रेकॉर्ड करुन त्यावरुन अश्लील व्हिडीओ तयार करण्यात येत असून त्या माध्यमाव्दारे आपणाकडून पैसे सुध्दा उकळण्यात येतील.

• व्हॉट्सॲप मॅसेंजर सारख्या वापरकर्त्यांनी सुध्दा सर्तक राहणे आवश्यक झालेले आहे. फसवणूक करणारा अज्ञात व्यक्ती आपले फेसबुक अकाउंट हॅक करुन फेसबुक मॅसेंजरव्दारे आपल्या फेसबुक फ्रेन्डशी चॅट करुन पैशाची मागणी करेल अथवा व्हॉट्सॲपचा क्रमांक आणि ओ.टी.पी. मागवून तुमचा व्हॉट्सअॅप सुध्दा हॅक करु शकतो. ओ.टी.पी. शेअर करु नका, असा सल्ला त्यांनी दिला.

आजच्या आधुनिक व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये इलेक्ट्रानिक्स साधनांचा वापर जास्त प्रमाणात होत असल्यामुळे विकासात भर पडलेली दिसून येत असली तरी फसवणूकीचे प्रकारात सुध्दा दिवसेंदिवस वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ज्या ज्या लोकांनी आपल्या फेसबुक अकाउंटचे पासवर्ड हे मोबाईल क्रमांक, आपल्या नावाचे अथवा आपल्या घरच्या व्यक्तीचे नावाने स्पेलींग अशाप्रकारे पासवर्ड ठेवलेले असतील त्यांचे फेसबुक अकाउंट हॅक होत आहेत. पासवर्ड ठेवतांना स्ट्रॉग कॅरेक्टर असावेत, असे वसंत जाधव यांनी सांगितले.

जनतेस आवाहन

• सोशल मिडीयाचे प्लॅटफॉर्म वरील वापरकर्त्यांनी कोणतीही पोस्ट करतांना तिची शहानिशा करावी. तसेच त्या पोस्टमुळे लोकांच्या भावना दुखावणार नाही याची विशेष दक्षता घेणे गरजेचे आहे.

• कोणत्याही जवळच्या व्यक्तीचे नाव सांगून जर कोणी आपली वैयक्तीक माहिती अथवा पैशाची मागणी करीत असेल तर फोनवर प्रत्यक्ष बोलून शहानिशा करावी.

• कोणत्याही व्यक्तीस ओ.टी.पी. देण्यात येऊ नये.

• फेसबुक, व्हॉट्सॲप चे सेटींग मध्ये जाऊन टू स्टेप व्हेरीफिकेशन प्रोसेस करुन घ्यावे.

• मोबाईल मध्ये येणाऱ्या कोणत्याही लिंकवर जाऊन आपली वैयक्तीक माहिती देऊ नये.

• ऑनलाईन पैसे पाठविण्याचे अगोदर योग्य शहानिशा करुन घ्यावे.

• आपली वैयक्तीक माहिती (युजर आयडी, पासवर्ड) हे डायरीवर अथवा दिसेल अशा कोणत्याही ठिकाणी लिहू नये.

• ऑनलाईन अकाउंट गुगल पे, फोन पे, इंटरनेट बँकींग, सोशल मिडीया अकाउंट फेसबुक, व्हॉट्सॲप, व्टिटर तसेच इतर महत्वाचे ॲपचे पासवर्ड हे गुंतागुंतीचे ठेवून ते पासवर्ड किमान 10 दिवसांनी बदल करावेत.

• कोणत्याही अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन आपणास येणारे व्हिडीओ कॉल रिसीव्ह करु नये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!