पश्चिम विदर्भ

म्युकरमायकोसीस शासकीय तसेच खाजगी रुग्णालयांनी त्वरीत रिपोर्टींग करण्याचे निर्देश

म्युकरमायकोसीस हा संसर्गजन्य आजार नाही

 लक्षणे आढळताच उपचार घेण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. 24 : कोव्हीडचा प्रादुर्भाव हा एकमेकांच्या संपर्कात आल्याने होत असला तरी कोव्हीड पश्चात होणारा म्युकरमायकोसीस हा आजार संसर्गजन्य नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता लक्षणे आढळताच त्वरीत वैद्यकीय उपचार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

नियोजन सभागृहात म्युकरमायकोसीसबाबत आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. हरी पवार, आयएमएचे अध्यक्ष डॉ. जोशी आदी उपस्थित होते.

म्युकरमायकोसीसकरीता वैद्यकीय महाविद्यालयात स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला असून खाजगी रुग्णालयात सुध्दा या आजाराचे रुग्ण आढळत आहे. शासकीय तसेच खाजगी रुग्णालयांनी म्युकरमायकोसीसच्या रुग्णांबाबत जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडे रिपोर्टींग करावी. जेणेकरून त्या प्रमाणात ‘ॲम्पोटेरेसीन बी’ हे इंजेक्शन मागणीच्या प्रमाणात जिल्ह्याला उपलब्ध होईल. अन्यथा जिल्ह्याला इंजेक्शनचा साठा मिळणार नाही व रुग्ण उपचारापासून वंचित राहील. त्यामुळे पोर्टलवर अशा रुग्णांची रिपोर्टींग होणे अत्यावश्यक आहे, याची सर्व रुग्णालयांनी दक्षता घ्यावी.

कोव्हीड पश्चात होणारा हा आजार वयोवृध्द तसेच मधूमेह असणा-यांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वयोगटातील नागरिकांनी त्वरीत तपासणी करून मधूमेह नियंत्रणात ठेवावे. लवकर निदान झाले तर उपचार लवकर मिळतील, या गोष्टीची जाणीव ठेवून कोणताही वेळ वाया घालवू नये. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात वॉर्ड क्रमांक 17 हा म्युकरमायकोसीसच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड करण्यात आला आहे. रुग्णांची संख्या लक्षात घेता वॉर्ड क्रमांक 15 मध्ये अतिरिक्त 35 बेडची व्यवस्था केली असून त्याला आणखी विस्तारीत करण्याचे नियोजन आहे. या आजारावर वैद्यकीय महाविद्यालयात मोफत उपचार असून येथील नाक, कान, घसा विभागामध्ये म्युकरमायकोसीसबाबत डेडीकेटेड ओपीडी सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

जिल्हास्तरावर म्युकरमायकोसीस या आजाराच्या नियंत्रणासाठी टास्क फोर्सची निर्मिती करण्यात येणार आहे. नियंत्रण कक्षसुध्दा स्थापन करण्यात येईल. या अंतर्गत नागरिकांसाठी दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देऊन यावर नागरिकांच्या शंका-कुशंकांची सोडवणूक करण्यात येईल. तसेच औषधोपचाराच्याबाबत माहिती देण्यात येईल.

कोव्हीडमधून बरे झालेल्या वयोवृध्द आणि मधूमेह असणा-यांचा डाटा शासकीय आणि खाजगी रुग्णालयांकडे आहे. तो सर्व डाटा जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने एकत्रित करावा. या रुग्णांपर्यंत म्युकरमायकोसीसची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना, घ्यावयाची काळजी आदींबाबत जनजागृती करण्यात येईल. तसेच सर्व समाजमाध्यमे, प्रसारमाध्यमे आणि वैयक्तिकरित्या दूरध्वनीद्वारे नागरिकांना म्युकरमायकोसीसची माहिती देण्यात यावी. पुढील सात-आठ दिवसांत मधूमेह आणि पोस्ट कोव्हीड रुग्णांचे स्क्रिनिंग करावे, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

यावेळी डॉ. गिरीश जतकर, डॉ. सुरेंद्र गवार्ले, डॉ. विजय डोंबाळे, डॉ. रमा बाजोरीया आदी उपस्थित होते.

म्युकरमायकोसीसची लक्षणे : या रोगाची लक्षणे पुढीलप्रमाणे आहे. चेह-याचे स्नायू दुखणे, चेह-यावर बधिरपणा येणे, अर्धशिशी (डोक्याची एक बाजू दुखणे), नाक चोंदणे, नाकावर सूज येणे, एका नाकपुडीतून रक्तस्त्राव, काळपट स्त्राव येणे, चेहरा अथवा डोळ्यावर सूज येणे, एक पापणी अर्धी बंद होणे, डोळा दुखणे, वरच्या जबड्याचे दात दुखणे किंवा हलू लागणे, अस्पष्ट दिसणे, ताप येणे.

काय करावे (प्रतिबंधात्मक उपाय) : रक्तातील साखरेवर काटेकोरपणे नियंत्रण ठेवणे, कान, नाक, घसा, नेत्र व दंत तज्ज्ञाकडून एका आठवड्यानंतर तपासणी करणे, वरील लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क करणे, डॉक्टरांनी सांगितल्यापेक्षा जास्त दिवस स्टिरॉईड न घेणे, टूथब्रश / मास्क वरचेवर बदलणे, दिवसातून एकदा गुळण्या करणे, वैयक्तिक व परिसरातील स्वच्छता ठेवणे, जमिनीखाली लागणा-या भाज्या नीट स्वच्छ धुवून खाव्यात. मातीत काम करतांना व खतांचा वापर करतांना पूर्ण बाह्यांचा शर्ट, फुलपॅन्ट, हातात ग्लोव्हज घालावे. तसेच नाकातोंडावर मास्क घालावा.

हे करू नये : छोट्या छोट्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. घरगुती उपायांचा पर्याय निवडू नये. वैद्यकीय सल्ल्यानेच स्टिरॉईड व इतर औषधांचे सेवन करावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!