
लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांचे गावपातळीवरच संस्थात्मक विलगीकरणावर करा – जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.
• कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी उपाययोजना
• गावामध्येच विलगीकरण कक्ष सुरु करण्याचे नियोजन
वाशिम, दि. २४ : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी बाधित रुग्णांचे संस्थात्मक विलगीकरण करणे आवश्यक आहे. याकरिता गावामध्येच विलगीकरण कक्षाची स्थापना करून लक्षणे नसलेल्या कोरोना बाधितांना त्याठिकाणी संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात यावे. या विलगीकरण कक्षामध्ये सर्व मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले. दुरदृश्य प्रणालीद्वारे आज, २४ मे रोजी आयोजित तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी (महसूल) सुनील विंचनकर, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार, शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, जिल्ह्यात सध्या कोरोना बाधितांच्या संख्येत घट होत आहे. मात्र, हा संसर्ग पुन्हा वाढू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्णांचे विलगीकरण गावपातळीवर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता गावामधील शाळा, समाज मंदिर अथवा मुलभूत सुविधा उपलब्ध असलेल्या इतर ठिकाणी विलगीकरण कक्ष स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सर्व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे नियोजन करून गावपातळीवर विलगीकरण कक्ष सुरु करण्याची कार्यवाही करावी. या कक्षामध्ये सर्व मुलभूत सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. तसेच आगामी पावसाळ्याच्या दिवसांत रुग्णांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. लक्षणे नसलेल्या कोरोना बाधितांना गावातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार असून सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर स्वतंत्र विलगीकरण करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात ज्या गावांमध्ये प्रथमच कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत, त्या गावात कोरोनाचा फैलाव होणार नाही, यासाठी त्या गावामध्ये कोरोना चाचणी शिबीर आयोजित करून संपूर्ण ग्रामस्थांची कोरोना चाचणी करण्यात यावी. कोरोना संसर्गासोबतच जिल्ह्यात म्युकरमायकोसीस आजाराचे रुग्णही आढळून येत आहेत. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागात विविध उपक्रम राबवून म्युकरमायकोसीस आजाराबाबत लोकांना माहिती द्यावी. दवंडी देवून जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिल्या. तसेच ग्रामीण भागात अजूनही काही डॉक्टर कोरोना बाधित रुग्णांवर विनापरवानगी उपचार करीत आहेत. तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांनी संयुक्तपणे अशा डॉक्टरांवर कारवाई करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकांची जिल्ह्याच्या सीमेवरच कोरोना चाचणी करून त्यांना जिल्ह्यात प्रवेश द्यावा. ई-पास शिवाय कोणीही जिल्ह्यात प्रवेश करणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.
जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पंत म्हणाल्या, गावपातळीवर संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरु करताना त्याठिकाणी पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छता गृह याची सुविधा असल्याची खात्री करावी. तसेच रुग्णांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घ्यावी.
निवासी उपजिल्हाधिकारी हिंगे म्हणाले, जिल्ह्यात सध्या रोज सुमारे ३५०० कोरोना चाचण्या होत आहेत. यामध्ये आणखी वाढ करणे आवश्यक आहे. शहरी व ग्रामीण भागातील गर्दी होणारी ठिकाणे, बाजारपेठ, तपासणी नाके याठिकाणी येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. तसेच गावपातळीवर सुरु करण्यात येत असलेल्या संस्थात्मक विलगीकरण कक्षाविषयी माहिती दिली