
लग्नाच्या वाढदिवशी पतीकडून पत्नीला एक किलो सोन्याचा हार,पोलिसांची एंट्री आणि हार निघाला नकली
लग्नाचा वाढदिवस पती पत्नी आनंदाने वेगवेगळ्या पद्ध्तीने साजरा करतात ,एकमेकांना भेटवस्तू देखील देत असतात. भिवंडीतील कोनगाव येथील एका पतीने लग्नाच्या वाढदिवसा निमित्ताने आपल्या पत्नीला चक्क एक किलो सोन्याचा हार भेट दिला. या भेटीने पत्नीचा आनंदाला पारावार उरला नाही,पत्नीने हा हार भेट देतानाचा व्हिडीओ सोशल मिडियावर पोस्ट केला. त्यानंतर व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओत नवरा हार भेट देतांना चित्रापटाचे गाणे गातांना देखील दिसत आहे. एन लोकडाऊन काळात नवऱ्याने आपल्या लग्नाच्या वाढदिवसाला आपल्या बायकोला एवढा महागडी भेट दिल्याने तालुका, जिल्ह्या बरोबरच राज्यात सर्वत्र या गिफ्टची मोठी चर्चा रंगली होती.
कोन गाव येथील रहिवासी बाळा कोळी यांनी पत्नीला चक्क एक किलो वजनाचा सोन्याचा हार भेट दिल्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि ती पोलिसांपर्यंत पोहचली,मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोनगाव पोलिसांनी बाळा कोळी यांना पोलीस ठाण्यात बोलावून सोन्याच्या महागड्या हाराची सुरक्षा कशी कराल, एवढी महागडी वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा किंवा इतर अन्य ठिकाणी सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा सल्ला दिला. त्यावेळी बाळा कोळी यांनी सांगितले की, “हा हार नकली आहे.” हार नकली असल्याचे समजताच पोलिसांना देखील आश्चर्य वाटले.
खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी त्या ज्वेलर्स मध्ये जाऊन माहिती घेतली असता ज्वेलर्स मालकाने हा हार नकली असल्याचे सांगितले. तसेच 38 हजार रुपयांना हा हार खरेदी करण्यात आल्याचे ज्वेलर्स मालकाने सांगितल्यानंतर पोलिसांनाही हा हार नकली असल्या बाबतची खात्री पटली व हार हा नकली असल्याचे निष्पन्न झाले.