पूर्व विदर्भ

कोविड परिस्थिबाबत पीएम मोदींनी वर्धा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतारांशी साधला सवांद

*ग्रामीण आणि शहरी भागांसाठी वेगवेगळे धोरण आखण्याचे अधिकाऱ्यांना केले आवाहन*

*ग्रामीण भारत कोरोनामुक्त करण्यावर भर द्यावा*

वर्धा दि 20:- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कोविड –19 परिस्थितीबाबत राज्य व जिल्हाधिकाऱ्यांशी दुरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी अधिकाऱयांनी आणि राज्याने केलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा करून ग्रामीण भाग कोरोनामुक्त करण्यासाठी भर देण्याचे आवाहन केले.

यावेळी महाराष्ट्रातील वर्धा, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, बुलडाणा, अहमदनगर, सातारा, सांगली, नाशिक, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, कोल्हापूर, सोलापूर, जालना, पालघर इत्यादी जिल्ह्यांचा सहभाग होता. यात अहमदनगर जिल्ह्याधिकारी यांना प्रधानमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी प्राप्त झाली. यावेळी मंत्रालयातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते.

दरम्यान, अधिकाऱ्यांनी कोविड -19 विरुद्धच्या लढाईत पंतप्रधानांनी केलेल्या नेतृत्वाबद्दल त्यांचे आभार मानले. अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना आपापल्या जिल्ह्यातील सुधारत असलेल्या कोविड परिस्थितीची माहिती दिली. वास्तविक वेळेत देखरेख आणि क्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापराचा अनुभव त्यांनी सामायिक केला. त्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये लोकसहभाग वाढवण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

या प्रसंगी बोलताना प्रधानमंत्र्यानी प्रत्येकाला महामारीविरोधात लढा देण्यासाठी पूर्ण बांधिलकी सुनिश्चित करण्याचे आवाहन केले. ते पुढे म्हणाले, कोरोना विषाणूने काम अधिक आव्हानात्मक केले आहे. या नवीन आव्हानांच्या दरम्यान, नवीन रणनीती आणि उपाय आवश्यक आहेत. गेल्या काही दिवसात देशात सक्रिय रुग्ण कमी होण्यास सुरवात झाली आहे. परंतु हा संसर्ग किरकोळ प्रमाणातही अस्तित्त्वात असेपर्यंत आव्हान कायम असल्याचे त्यांनी बजावले.

महामारी विरुद्ध लढा देताना राज्य आणि जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामांची प्रधानमंत्र्यानी प्रशंसा केली आणि सांगितले की, या क्षेत्रातील त्यांच्या कामाचे अनुभव व अभिप्रायांची व्यावहारिक व प्रभावी धोरणे बनवण्यात मदत होते. सर्व स्तरावर राज्ये व विविध हितधारकांच्या सूचनांचा समावेश करून लसीकरण धोरणही पुढे राबवले जात आहे.

स्थानिक अनुभव आणि देश म्हणून एकत्र काम करण्याची गरज यावर पंतप्रधानांनी भर दिला. रुग्णसंख्या कमी होत असली तरीही गावे कोरोनामुक्त ठेवण्यासाठी आणि कोविड-योग्य वर्तनाचे पालन करण्याचे संदेश प्रसारित करण्याचे त्यांनी आवाहन केले. ग्रामीण व शहरी भागासाठी विशिष्ट मार्गाने रणनीती आखून ग्रामीण भारत कोविडमुक्त करण्याची सूचना पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना केली.

प्रधानमंत्री म्हणाले की, प्रत्येक महामारीने, तिला सामोरे जाण्याच्या आपल्या पद्धतींमध्ये सतत नाविन्यपूर्ण संशोधन आणि बदल घडवून आणण्याचे महत्त्व आपल्याला शिकवले आहे. महामारीचा सामना करण्यासाठीच्या पद्धती व धोरणे गतीशील असावीत कारण विषाणू उत्परिवर्तन आणि स्वरूप बदलण्यात माहीर आहे विषाणू उत्परिवर्तन हा आता तरुण आणि मुलांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. त्यासाठी त्यांनी लसीकरण मोहिमेला चालना देण्यावर भर दिला.

लस वाया जाण्याबाबत पंतप्रधान म्हणाले, एका मात्रेचा अपव्यय म्हणजे एका व्यक्तीच्या जीवनाचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांनी लसीचा अपव्यय रोखण्याचे आवाहन केले.

जीव वाचवताना नागरिकांचे जीवनमान सुलभ करण्याला प्राधान्य देण्यावर त्यांनी भर दिला. गरीबांना मोफत शिधाची सुविधा पुरवावी , इतर आवश्यक वस्तू पुरविल्या पाहिजेत आणि काळाबाजार थांबवायला हवे, असे ते म्हणाले. हा लढा जिंकण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठीही हे उपाय आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी हा युद्धाचा सेनापती असला तरी तेथील स्थानिक प्रशासन, अनेक व्यक्ती, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, आणि नागरिकांच्या सहकार्याने ही महामारी थांबवायची आहे त्यामुळे सर्वांच्या सहभाग आणि सहकार्याने आपल्याला पुढील काळात कोरोनाशी लढा देऊन यशस्वी व्हायचे आहे, त्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्यात. तसेच मास्क, शारीरिक दुरीता आणि स्वच्छता या बाबी लोकांच्या सवयीचा भाग होण्यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी वर्धा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके उपस्थित होते.

केंद्रीय आरोग्य सचिवांनी देशाची इतर देशांशी तुलनात्मक आकडेवारी सांगताना ते म्हणाले की, आपल्याकडे 10 हजार लोकसंख्येमागे 12 डॉक्टर आहेत तर युरोपियन देशांमध्ये 30- 35 आहेत. आपल्या देशात 10 लक्ष लोकसंख्येमध्ये 18 हजार कोविड रुग्ण आढळून येतात, ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या अमेरिकेत 10 लाखामागे 17 हजार आहे तर भारतात 2318 आहे, प्रति 10 लक्ष लोकसंख्येमागे भारतात 204 आहेत तर इटली किंवा ब्राझील मध्ये 2 हजार पेक्षा जास्त आहेत. आपल्याकडे 2 टक्के लोकसंख्या प्रभावित आहे तर अमेरिकेत हेच प्रमाण 10 टक्के आहे. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत आपली कामगिरी चांगली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!