पश्चिम विदर्भ

वाशिम जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची जिल्हा सीमेवरच कोरोना चाचणी करा – जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना

सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर राहावे

• गर्दी नियंत्रणासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक

वाशिम, दि. २०  : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांमध्ये घट होत असल्याचे दिसत आहे. मात्र, तरीही तालुकास्तरीय यंत्रणांनी गाफील न राहता कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची जिल्ह्याच्या सीमेवरच कोरोना चाचणी करून त्यांना जिल्ह्यात प्रवेश देण्यासाठी नियोजन करावे. ई-पास शिवाय कोणालाही जिल्ह्यात येण्याची अथवा जिल्ह्याबाहेर जाण्याची परवानगी देवू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिल्या.

जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी यांच्यासोबत दुरदृश्य प्रणालीद्वारे आज, २० मे रोजी आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक मोरे या आढावा बैठकीत सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, जिल्ह्यात काही सवलतींसह २७ मे पर्यंत कडक निर्बंध लागू राहणार आहेत. या दरम्यान सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत काही दुकाने, अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे या कालावधीत शहरी व ग्रामीण भागात लोकांची एकाच ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता असल्याने तालुकास्तरीय यंत्रणा प्रमुखांनी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत प्रत्यक्ष फिल्डवर राहून आवश्यक कार्यवाही करावी. कोणत्याही परिस्थितीत एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच परवानगी नसलेली दुकाने सुरु असल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

रेशन दुकाने, बँक, कृषि सेवा केंद्र व अवजारांची दुकाने याठिकाणी गर्दी होवू नये, यासाठी विशेष काळजी घ्यावी. शेतकऱ्यांना बियाणे व खते बांधावर पोहोच करण्याच्या सूचना कृषि विभागाला देण्यात आल्या आहेत. तसेच बँक खातेधारकांनाही डाक विभाग व बँक व्यवसाय प्रतिनिधींद्वारे खात्यातील रक्कम घरपोच उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुषंगाने तालुकास्तरावर अंमलबजावणी होण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी यावेळी दिल्या. कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी तालुक्यातील बालरोग तज्ज्ञांची बैठक घेवून आवश्यक सूचना द्याव्यात. तसेच नियमित लसीकरण, पोषण आहार वितरण यामध्ये कोणत्याही परिस्थितीत खंड पडणार नाही, याची दक्षता घ्यावी. पावसाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या साथींच्या आजारावर उपचार करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात पुरेसा औषधसाठा सज्ज ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पंत म्हणाल्या, जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांची संख्या आणखी वाढविणे आवश्यक आहे. तसेच या चाचण्यांची माहिती त्याच दिवशी पोर्टलवर अपलोड करावी. लक्षणे नसलेल्या कोरोना बाधितांसाठी गावपातळीवर आयसोलेशन सेंटर उभारण्याबाबत तालुकास्तरावर नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

निवासी उपजिल्हाधिकारी  हिंगे म्हणाले, ज्या बँकांमध्ये गर्दी होत आहे, तेथे टोकन पद्धत सुरु करण्याबाबत नियोजन करावे. तसेच नियमांचे सतत उल्लंघन करणाऱ्या आस्थापनाधारक, दुकानदारावर गुन्हे दाखल करून सदर आस्थापना कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती घोषित असेपर्यंत सील करावी.

जिल्हा आरोग्य अधिकारी आहेर म्हणाले, जिल्ह्यात गृह विलगीकरणामध्ये असलेल्या रुग्णांची ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’ करणे आवश्यक आहे. याकरिता तालुका आरोग्य अधिकारी यांनी सर्व संबंधितांना सूचित करून त्याअनुषंगाने कार्यवाही करावी.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!