
वाशिम जिल्ह्यात शेती अवजारे, उपकरणांची दुकाने सुरु ठेवण्यास मुभा
• फक्त बँक कामासाठी आपले सरकार सेवा केंद्र सुरु राहणार
वाशिम, दि. १७ : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंध आदेशात अंशतः बदल करून जिल्ह्यातील शेती अवजारे व उपकरणांची दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज, १७ मे रोजी निर्गमित केले आहेत.
या आदेशानुसार जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी शेती अवजारे व उपकरणांची दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील. तसेच केवळ बँकांच्या संबंधित व्यवहारासाठी जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहतील. मात्र, या केंद्रांवर इतर कोणत्याही सेवा देता येणार नाहीत. एलआयसी कार्यालाचे अंतर्गत कामकाज सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु ठेवता येईल, मात्र ग्राहकांसाठी सेवा बंद राहील.
सनदी लेखापाल (सीए) यांची कार्यालये कमीत कमी मनुष्यबळामध्ये सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत फक्त अंतर्गत कामासाठी सुरु राहू शकतील. ग्राहकांना कार्यालयात जाता येणार नाही. केंद्रीय भांडार निगमचे कर्मचारी, हमाल यांना ओळखपत्र जवळ ठेवण्याच्या अधीन राहून त्यांच्या कामासाठी जाण्याची मुभा राहील. याशिवाय बँकांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी इंडियन पोस्ट पेमेंटस बँकेच्या सेवेचा उपयोग करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.