
श्रीमती शोभादेवी गोयनका कोविड केअर सेंटरला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट
अकोला दि 17 मे : येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदर्श संस्कार मंडळ द्वारा संचालित श्रीमती शोभादेवी गोयनका कोविड केअर सेंटरला राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन पाहणी केली. सामाजिक दायित्व भावनेतून चालणाऱ्या प्रकल्पातील विविध व्यवस्था बाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शोभादेवी गोयनका कोविड केअर सेंटरला सदिच्छा भेट दिली. येथे एकुण अलगिकरणासाठी ४४ तर प्राणवायू युक्त २६ खाटांची व्यवस्था आहे. हा प्रकल्प ना नफा ना तोटा या तत्वावर कार्यरत असून, येथील सर्वच व्यवस्थांची पाहणी करून श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला तर उपचारा नंतर सुटी झालेल्या रुग्णाला सतत प्राणवायू देणारे तुळस रोप भेट देऊन प्राणवायूचे महत्व अधोरेखित केले जाते, या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
यावेळी विभाग संघचालक प्रा.नरेंद्र देशपांडे, महानगर संघचालक गोपाल खंडेलवाल, प्रकल्पाचे वैद्यकीय संचालक डॉ. सदानंद भुसारी, डॉ तुषार चरखा, प्रकल्प प्रमुख मोहन मिश्रा, सह प्रमुख भूषण पिंपळगावकर, महानगर कार्यवाह रुपेश शहा, आदर्श संस्कार मंडळाचे सचिव शशांक जोशी, अकोला अर्बन बँकेचे उपाध्यक्ष शंतनू जोशी, दीपक मायी आदी उपस्थित होते.