
यवतमाळात 16 ते 17 मे दरम्यान विजांच्या कडकडाटसह पावसाची शक्यता
जिवित व वित्तहाणी टाळण्यासाठी नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. 14 : नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात 16 ते 17 मे दरम्यान विजांच्या कडकडाटसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे वीज पडून होणारी जिवित व वित्तहाणी टाळण्यासाठी नागरिकांनी दक्ष राहावे. तसेच दिलेल्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
नैसर्गिक वीज पडून मोठ्या प्रमाणात जिवित व वित्त हानी होत असते. त्यामुळे नागरिकांनी पुढील बाबींप्रमाणे दक्षता घ्यावी. वादळी वारा / विजा चमकत असल्यास घराच्या खिडक्या व दरवाजे बंद ठेवा. तसेच घरातील दरवाजे, खिडक्या व कुंपनापासून दूर राहावे. मेघगर्जना झाल्यापासून 30 मिनिटे घराच्या आतच राहावे. घराबाहेर असल्यास त्वरीत सुरक्षित निवा-यांच्या ठिकाणाकडे (मजबूत इमारतीकडे) प्रस्थान करावे. ट्रॅक्टर, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांच्यापासून दूर रहा. गाडी चालवित असल्यास सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करा. उघड्यावर असल्यास शेवटचा पर्याय म्हणून लगेच गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व डोके दोन्ही गुडघ्याच्या मध्ये झाकावे. जमिनीशी कमीत कमी संपर्क असावा. मोकळ्या तसेच लटकत्या विद्युत तारांपासून दूर राहा. जंगलामध्ये दाट, लहान झाडाखाली तसेच उताराच्या जागेवर निवारा घ्यावा. इतर खुल्या जागेवर दरीसारख्या खोल जागेवर जाण्याचा प्रयत्न करा.
वीज पडल्यास / वज्रघात झाल्यास : त्वरीत रुग्णवाहिका व वैद्यकीय मदत बोलवा. वज्रघातबाधित व्यक्तिस त्वरीत वैद्यकीय मदत मिळवून द्या. त्याला हात लावण्यास धोका नाही. ओल्या व थंड परिस्थितीत बाधित व्यक्ती जमिनीच्यामध्ये संरक्षणात्मक थर ठेवावा. जेणेकरून हायपोथरमियाचा (शरीराचे अति कमी तापमान) धोका कमी होईल. बाधित व्यक्तिचे श्वसन बंद असल्यास तोंडावाटे पुनरुत्थान प्रक्रिया अवलंबवावी. हृदयाचे ठोके बंद असल्यास कुठलीही वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रुग्णाची हृदयगती सीपीआर करून सुरू ठेवा.
काय करू नये : गडगडाटीचे वादळ आल्यास उंच जागांवर, टेकडीवर, मोकळ्या जागेवर, समुद्र किनारी, स्वतंत्र झाडे, रेल्वे / बस / सहलीची आश्रयस्थाने, दळणवळणाची टॉवर्स, ध्वजाचे खांब, विद्युत / दिव्यांचे खांब, धातुचे कुंपन, उघडी वाहने आणि पाणी इत्यादी टाळावे.
घरात असल्यास : वायरद्वारे जोडले असलेले फोन / मोबाईल व इतर इलेक्ट्रिक / इलेक्ट्रॉनिक उपकरणे विद्युत जोडणीस लावू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. या दरम्यान आंघोळ करणे, हात धुणे, भांडी, कपडे धुणे आदी कार्ये करू नये. काँक्रीटच्या (ठोस) जमिनीवर जमिनीवर झोपू नये किंवा उभे राहू नये. प्रवाहकीय पृष्ठभागांची (धातुची दारे, खिडक्यांची तावदाने, वायरींग, प्लंबींग / नळ) संपर्क टाळावा.
घराबाहेर असल्यास : मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असतांना किंवा वादळी वारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहू नये. वाहनांच्या धातू किंवा विजेचे सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. अधांतरी लटकणा-या केबल पासून लांब राहावे