
शेतकऱ्यांना बियाणे, खते मिळणार बांधावर !ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन
• वाशिम कृषि विभागाचा उपक्रम
वाशिम, दि. १४ : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात सध्या कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आगामी खरीप हंगाम लक्षात घेता शेतकऱ्यांना बियाणे, खते वेळेवर उपलब्ध व्हावीत, यासाठी कृषि विभागामार्फत बांधावर बियाणे, खते उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याकरिता शेतकऱ्यांना ऑनलाईन स्वरुपात मागणी नोंदवावी लागणार आहे. त्यासाठी कृषि विभागाने https://sites.google.com/view/krushivibhag/ ही ऑनलाईन गुगल लिंक तयार केली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी दिली आहे.
गुगल लिंकद्वारे प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र फॉर्म तयार करण्यात आला असून त्यामध्ये संबंधित नजीकचे कृषि सेवा केंद्र निवडण्याची सुविधा शेतकरी, शेतकरी गटांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाईन पध्दतीने बियाणे, खते, बीजप्रक्रिया साहित्य कोणत्याही गटाला खरेदी करता येणार आहे. त्याकरिता शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्याच्या लिंकद्वारे फॉर्म भरून द्यायचा आहे. प्रत्येक तालुकास्तरावर तालुका कृषि अधिकाऱ्याकडे माहिती संनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तालुका कृषि अधिकारी, तंत्र अधिकारी, मंडळ अधिकारी हे त्यावर लक्ष ठेवून आहेत.
शेतकऱ्यांची मागणी प्राप्त होताच संबंधित कृषि सहाय्यक यांना कळविण्यात येईल व सदर कृषि सहाय्यक शेतकऱ्यांशी संपर्क करतील. शेतकऱ्यांनी नमूद केलेल्या कृषि सेवा केंद्रातून निविष्ठा थेट बांधावर पोहोचविण्यासाठी कृषि सहाय्यक मदत करतील. गतवर्षी याच पद्धतीने जिल्ह्यात बांधावर खते, बियाणे उपलब्ध करून देण्यात आली होती. १३ हजार ८७९ मेट्रिक टन खते, २१ हजार ३०५ क्विंटल बियाणे, २६ हजार ७१७ कपाशी बियाणे पाकिटे आदी कृषि निविष्ठांची खरेदी शेतकरी गटांमार्फत २९ हजार ९६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने केली होती, अशी माहिती तोटावार यांनी दिली आहे.