नागपूर

बालकांमध्ये काय आहे कोरोनाची लक्षणे, आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या !

नागपूर, ता. १४ : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत आहे. पुढील काही काळात १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण बऱ्याच प्रमाणात आटोपले असेल. १८ वर्षाखालील मुलांना अद्याप लस देण्यासंदर्भात कुठलेही निर्देश नाहीत. त्यामुळे तिसऱ्या लाटेत १८ वर्षाखालील मुले बऱ्याच प्रमाणात प्रभावित होऊ शकतात. ही शक्यता लक्षात घेता बालकांमध्ये कोरोनासदृश कुठलीही लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे तज्ज्ञांनी सांगितले.

नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएशनच्या संयुक्त विद्यमाने ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. शुक्रवारी (ता. १४) आयोजित कार्यक्रमात संसर्गरोग तज्ज्ञ डॉ. अश्विनी तायडे आणि नवजात शिशु तथा बालरोग तज्ज्ञ डॉ. संजय देशमुख सहभागी झाले होते. ‘बालक आणि वयस्क व्यक्तींमध्ये होणारा कोव्हिड आणि इतर संसर्गजन्य आजार’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ. अश्विनी तायडे म्हणाल्या, कोव्हिड हा संसर्गजन्य असून मागील वर्षांपासून त्यांनी संपूर्ण जगाला हैराण करून सोडले आहे. कोव्हिडमधून पूर्णत: बरे झाले तरी त्यानंतरही अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. म्यूकरमायकोसिस (काळी बुरशी) हा कोव्हिडनंतर होणारा आजार वेगाने पसरतो आहे. त्याची लक्षणे दिसताच वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. हा आजार होऊ नये यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे. दातांमधून हा आजार वाढण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे स्वच्छता ठेवा. काळजी घ्या आणि वेळीच उपचार करा, असा सल्ला त्यांनी दिला.

डॉ. संजय देशमुख यांनी लहान मुलांमध्ये कोव्हिडची काय लक्षणे असू शकतात, याविषयी सविस्तर माहिती दिली. ताप आल्यानंतर पॅरासिटॅमॉल देऊनही ताप कमी न होणे, सर्दी, हगवण कमी न होणे, चिडचिडपणा वाढणे, सुस्ती येणे आदी लक्षणे मुलांमध्ये दिसल्यास तातडीने बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. वर्षभरापासून कोव्हिडमुळे लहान मुलांना द्यावयाच्या अन्य लसी घेण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. मात्र, यात हलगर्जीपणा मुळीच नको. एखादी लस घ्यायला उशीर झाला तरी चालेल. उशीर झाला म्हणून ती द्यायचीच नाही, असे करु नका. लहान मुलांसाठी कोव्हिड प्रतिबंधात्मक लस अद्याप आली नाही. त्यामुळे तिसऱ्या लाटेत लहान मुले अधिक प्रभावित होऊ शकतात, असा अंदाज बांधूनच तिसऱ्या लाटेशी लढा देण्यासाठी तयारी सुरू आहे, असेही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!