
देश रामभरोसे ; पंतप्रधान, गृहमंत्री गायब, ‘महाराष्ट्र मॉडेल’ लागू करा: संजय राऊत
कोरोनाच्या वाढत्या संक्रमण काळात देशात पंतप्रधान आहेत. केंद्रीय गृहमंत्री आहेत. पण ते गायब आहेत. त्यामुळे देश रामभरोसे चालला आहे, असं सांगतानाच अहंकार बाजूला ठेवून देशात महाराष्ट्र मॉडेल लागू करा, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. (sanjay raut slams bjp over corona crisis)
संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली. या देशात सरकार आहे. प्रशासन आहे. पंतप्रधान आहेत. आरोग्य मंत्रीही आहेत. पंतप्रधान जागेवरच आहेत. पण त्यांचं अस्तित्व दिसणं महत्त्वाचं आहे. त्यांनी अदृश्य होऊन चालणार नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
प्रभू रामाच्या अयोध्येत लोक मरत आहेत,गंगेत प्रेत सापडत आहे
गंगा-यमुना नदीत प्रेत सापडत आहेत. नद्यांमध्ये प्रेतांचा खच दिसून येत आहे. मृतदेहांवर व्यवस्थित अंत्यसंस्कारही करता येत नाही. या पूर्वी या देशात असं कधीच झालं नव्हतं. देशात नुसता हाहाकार माजला आहे. प्रभू श्रीरामाच्या अयोध्येत ऑक्सिजन अभावी लोक मरत आहेत. अहंकार आणि राजकारण विसरून जर बोलणी केली तर देश पुढे जाईल, असंही राऊत यावेळी म्हणाले.