
वर्धेत कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस 12 मे पासून चार केंद्रावर सुरू होणार
*रेल्वे, पोलीस, सामान्य रुग्णालय आणि गांधी मेमोरियल लेप्रसी हॉस्पिटलचा समावेश*
*राज्य शासनाने दिली मंजुरी*
*एका केंद्रावरून देणार २०० लाभार्थ्यांना व्हॅक्सिन*
वर्धा दि ११ मे :- कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्याची मुदत संपण्यास येत असलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना शासनाकडून वेळीच लस उपलब्ध होण्याची आशा नसल्याने जिल्हा आरोग्य विभागाने या लाभार्थ्यांना राज्य शासनाने १८ ते ४४ वयोगटासाठी पुरवठा केलेली कोव्हॅक्सिन लस देण्यासाठी परवानगी मागितली. त्याला शासनाने मंजुरी दिल्याने उद्या बुधवार १२ मे पासून सिव्हील लाईन भागातील पोलीस रुग्णालय तसेच स्टेशनफैल येथील रेल्वे रुग्णालय आणि सामान्य रुग्णालय आणि गांधी मेमोरियल लेप्रसी रुग्णालय या चार केंद्रांवरून लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.
कोविशिल्ड तसेच कोव्हॅक्सिन या दोन कोविड प्रतिबंधात्मक लसीला शासनाने मंजुरी दिली आहे. पूर्णपणे सुरक्षीत असलेल्या या दोन्ही लसी घेण्यासाठी वर्धेत लाभार्थ्यांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. परंतु, मागील काही दिवसांपासून लस तुटवड्यामुळे आरोग्य विभागाची लसीकरण मोहिम थंडावली आहे. याच पार्श्वभूमीवर कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस कसा द्यावा असा प्रश्न आरोग्य विभागापुढे होता. त्यानंतर आरोग्य विभागाने राज्य शासनाने पुरवठा केलेल्या कोव्हॅक्सिन लसीचा वापर ४५ पेक्षा जास्त वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यासाठी परवानगी मागितली. त्याला शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे वर्धा शहरात चार ठिकाणी लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. त्यासाठीचे नियोजन आरोग्य विभागाकडून करण्यात आले असून एका केंद्रावरून किमान २०० लाभार्थ्यांना लस दिली जाणार असल्याचे अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रभाकर नाईक यांनी सांगितले.
ऑफलाईन मिळणार लस
रेल्वे रुग्णालय तसेच पोलीस रुग्णालय , सामान्य रुग्णालयल आणि गांधी मेमोरियल लेप्रसी रुग्णालय या चार केंद्रांवरून बुधवारपासून लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. या ठिकाणी २०० लाभार्थ्यांना स्पॉट रजिस्टेशन करून लसीचा दुसरा डोस घेता येणार आहे.
दोन दिवसानंतर ग्रामीण भागातही कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यासाठी केंद्र सुरू करण्यात येईल. १० दिवसात सर्व लाभार्थ्यांना दुसरा डोस उपलब्ध होईल. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन डॉ. प्रभाकर नाईक यांनी केले आहे.
तसेच आज कारंजा व समुद्रपूर ग्रामीण रुग्णालयात ४५ वर्षावरील लसीकरण सुरू होते, तर कारंजा, समुद्रपूर आणि सेलू ग्रामीण रुग्णालयात १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. उद्या (१२ मे रोजी) कोविशील्ड लस जिल्ह्याला उपलब्ध होणार असून पुन्हा लसीकरणाची मोहीम वेग घेईल,असेही नाईक यांनी सांगितले.