पश्चिम विदर्भ

गॅस सिलेंडरचा स्फोट, गर्भवती महिला आणि चिमुकलीचा होरपळून मृत्यू

यवतमाळ दिनांक 9 मार्च (प्रतिनिधी)

आर्णी तालुक्यातील आयता येथील एका घरात बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास अचानक गॅसचा भडका उडून सिलिंडरचा स्फोट झाला. संपूर्ण घराला आगीने वेढले. या आगीत सात महिन्यांच्या गर्भवती महिलेसह तिच्या चार वर्षीय चिमुकलीचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गावावरच शोककळा पसरली.

काजल विनोद जयस्वाल (३०) आणि परी विनोद जयस्वाल (४) अशी आगीत होरपळून मृत्यू पावलेल्या मायलेकींची नावे आहेत. बुधवारी सकाळच्या सुमारास काजल स्वयंपाक करीत होती. त्यावेळी अचानक गॅसचा भडका उडाला. नंतर लगेच सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे संपूर्ण घर आगीच्या विळख्यात सापडले. त्यावेळी घरात काजल, परी आणि काजलची सासू प्रतिमा गंगाप्रसाद जयस्वाल (६०) या तिघीच होत्या.

आग लागताच तिघीही बाहेर पडल्या. मात्र चिमुकली परी काही तरी आणण्यासाठी आगीच्या वणव्यातही घरात शिरली. तिच्या मागोमाग तिची आई काजलही घरात गेली. तेथेच घात झाला. काजल आणि परी यांचा आगीत सापडून कोळसा झाला. मात्र प्रतिमा जयस्वाल कशातरी बचावल्या.

पती गेले होते पालखीला 

आयता गावात दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव येथील मुंगसाजी माऊली यांचे अनेक भक्त आहेत. काजलचे पती विनोदसुद्धा माउलींचे भक्त आहेत. दरवर्षी गावातून धामणगाव देव येथे पालखी जाते. मंगळवारी गावातून पालखी निघाली. त्यासोबत गावातील ३० ते ४० नागरिकही पायदळ रवाना झाले.

बुधवारी सकाळी विनोद जयस्वाल दुचाकीने धामणगाव (देव) येथे गेले होते. त्यांना घटनेची माहिती मिळताच तातडीने ते गावाकडे परत आले. मात्र तोपर्यंत गर्भवती पत्नी व चिमुकलीचा मृत्यू झाला होता. विनोदने एकच हंबरडा फोडला. त्यांना समजविताना गावकऱ्यांच्या डोळ्यांतही अश्रू तरळत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!