
वाशिममध्ये अत्यावश्यक सेवेत नवीन बाबींचा समावेश
अत्यावश्यक सेवेत नवीन बाबींचा समावेश
वाशिम, दि. ०८ : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात ९ मे रोजीच्या दुपारी १२ वाजेपासून ते १५ मे रोजीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हे आदेश जैसे थे ठेवून अत्यावश्यक सेवेमध्ये आणखी काही बाबींचा समावेश करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज, ८ मे रोजी निर्गमित केले आहेत.
या आदेशानुसार ७ मे रोजीचे आदेश जैसे थे ठेवून अत्यावश्यक सेवेमध्ये महावितरण, कोषागार, पाणी पुरवठा, स्वच्छता, दूरसंचार, उपप्रादेशिक परिवहन इत्यादी शासकीय कार्यालये सुरु राहतील. तसेच जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांना सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत वृत्तपत्रे घरपोच पोहचविण्याची मुभा राहील. परंतु कोठेही स्टॉल लावून वृत्तपत्र विक्री करता येणार नाही.
कार्यालयात कर्मचारी उपस्थितीबाबत ३० एप्रिल २०२१ रोजीच्या आदेशातील अटी व शर्ती कायम राहतील. आवश्यकते प्रमाणे कमी अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यालय सुरु राहू शकतील. अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यालयाने निर्गमित केलेले ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.